जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण

December 13, 2016 2:03 PM0 commentsViews:

mahadev_jankar_mahyuti

13 डिसेंबर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावत त्याच्यावर दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेत विरोधक आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जानकरांना क्लीन चीट दिली आहे. महादेव जानकर हे एक सज्जन मंत्री असून त्यांच्या विरोधातील गुन्हा हा गंभीर नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं आहे.

विधानसभेचं आज (मंगळवारी) कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाने महादेव जानकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. महादेव जानकर यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करत निवडणूक अधिकाऱ्याला आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हे चिन्ह द्या आणि काँग्रेसचा अर्ज बाद करा, असं म्हणत संबंधित अधिकाऱ्याला धमकावलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जानकरांना मंत्रिमंडळात बसवण्याचा कोणताही अधिकारी नाही, असं म्हणत विरोधकांनी जानकरांच्या राजीनाम्याची मागणी केली.

यासगळ्यात मुख्यमंत्र्यांनी मात्र जानकरांना क्लीन चीट दिली आहे.  महादेव जानकर सज्जन मंत्री आहेत. त्यांना उगाच त्रास दिला जातोय. त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल असून हा प्रकार गंभीर नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close