धनदांडग्यांकडे एवढ्या नोटा येतात तरी कुठून? आतापर्यंत 250 कोटींच्या नव्या नोटा जप्त

December 13, 2016 9:48 PM0 commentsViews:

18 डिसेंबर : नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन 35 दिवस उलटलेत तरी पैैशांसाठीच्या बँकांसमोेरच्या रांगा काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे मात्र, धनदांडग्यांना कमिशन बेसिसवर जुन्या नोटा बदलून देण्याचा काळा धंदा हवालामार्फत एकदम जोरात सुरू आहे. सरकारने देशभरात विविध ठिकाणी छाप्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 250 कोटींचं नव्या नोटा पकडण्यात आल्यात यावरूनच या नोटाबंदीच्या घाईगडबडीतही काही भ्रष्ट बँक अधिका-यांनी आपले हात ओले करून घेतलेत हेच स्पष्ट होतंय. त्यामुळे नोटाबंदीचा उद्देश खरंच सफल झालाय असा प्रश्न विरोधक विचारू लागलेत.

2000_rs_noteधनदांडग्यांकडे एवढ्या नोटा येतात तरी कुठून? होय, नोटाबंदीनंतर काहीसं असंच म्हणण्याची वेळ आता जनसामान्यांवर आलीय. कारण नोटाबंदी काळापैसा बाहेर तर आलाच नाही. उलटपक्षी गोरगरिबांना आपल्या हक्कांच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागतंय. याचाच अर्थ असा की, नोटाबंदीच्या चलन पुरवठ्यात मोठी गडबड झालीये. कारण नोटाबंदीनंतर देशभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 250 कोटींच्या नव्या नोटा सापडल्यात. म्हणूनच राहुल गांधी आणि पी. चिदंबरम यांनी सरकारच्या या नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केलीय.

काँग्रेसच्या आरोपांना नियोजबद्ध अंमलबजावणीद्वारे प्रत्युत्तर देण्याऐवजी अरूण जेटली मात्र, प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहेत.

दरम्यान, चलनबदलीदरम्यानचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यावर पूर्णतः बंदी घातली खरी…पण त्यानं भ्रष्टाचार थांबला का ?,तर उत्तर नाही असंच द्यावं लागतंय. कारण धनदांडग्यांनी खासगी बँकांच्या भ्रष्ट अधिका-यांना हाताशी धरून आपल्याकडचा काळा पैसा बिनदिक्तपणे बदलून घेतलाच की, देशभरातल्या विविध छाप्यांमधून तरी तेच स्पष्ट होतंय. म्हणूनच सरकारने सहकारी बँकांवर बंदी घालून नेमकं काय साधलं? असा परखड सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारलाय.

सहकारी बँकांवर बंदी घातल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोडमडलीय. तर दुसरीकडे शहरांमध्येही बँकासमोरच्या रांगी कमी होत नाहीत. एकूणच कायतर नोटाबंदीनंतरच्या अंमलबजावणीत सरकार पूर्णतः अपयशी ठरलंय. पण हे मान्य करण्याऐवजी सरकारने आता कॅशलेस व्यवहाराची भलतीच टूम काढलीय. पण आपल्या देशात मुळात पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने त्यातला फोलपणा एव्हाना उघडही झालाय. म्हणूनच सरकारने अंमलबाजवणीतल्या चुका सुधारण्यासाठी तात्काळ जास्तीचं नवं चलन बाजारात उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे नाहीतर भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडण्याचा मोठा धोका संभवतोय .

27% नव्या नोटा चलनात
- बाद झालेल्या 500 आणि 2000 हजारांच्या नोटा – 16 लाख कोटी
- बँकांकडे जमा झालेल्या नोेटा – 12.44 लाख कोटी
- चलनात आलेल्या नव्या नोटा – 4 लाख 61 हजार कोटी
- नोटबंदीच्या अंदाजे 27 टक्के नव्या नोटा चलनात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close