प्रयत्न पडले तोकडे, तरी गडाला गेले तडे!

December 15, 2016 6:02 PM0 commentsViews:

अद्वैत मेहता, पुणे

15 डिसेंबर :  पुणे जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायचे भाजप शिवसेनेचे प्रयत्न तोकडे पडले असले, तरी शह काटशह आणि कुरघोडी काटाकाटीच्या राजकारणात काँगेस आणि राष्ट्रवादीच्या गडांना तडे गेल्याचं चित्र बारामती, इंदापूर, सासवड, जेजुरी, दौंडच्या नगरपालिका निकालात पाहायला मिळालं. या पट्‌ट्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं असून शिवसेनेच्या मर्यादा उघड्या पडल्या तर भाजपचा सुपडा साफ झाला.

dasd

बारामतीमध्ये राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची गर्जना करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला बारामती, इंदापूर, सासवड, जेजुरी, दौंड या 5 नगर पालिका निवडणुकीत मतदारांनीच पाणी पाजलं.

राष्ट्रवादीने इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या गडाला सुरुंग लावला खरा पण पाटलांनी बुरूज ढासळू दिला नाही उलट सासवडचा गड राखताना जेजुरीचा मल्हारी मार्तंड काँग्रेसच्या संजय जगतापांनी राष्ट्रवादीच्या दिलीप बारभाई यांच्याकडून खेचून घेतला. दौंडमध्ये मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी करत कुल-कटारिया आघाडीला शह दिला आहे.

भाजप ,सेनेची न झालेली युती आणि तोडीस तोड उमेदवार न मिळल्याने भाजप सेनेच्या मनसुब्यांना खीळ बसली. तर विक्रमी मतदान करून जनतेनं आम्हाला गृहित धरू नका हाच संदेश सत्तेत मश्गुल असलेल्या नेत्यांना दिला आहे.

एकूणच पुण्याच्या दुष्काळी भागातील जनतेला भूमिगत गटार योजना, मुबलक पाणी , सार्वजनिक शौचालयं या नागरी सुविधा आणि वीज, रस्ते, आरोग्य या पायाभूत सुविधा निवडून आलेल्या कारभार्‍यांनी राजकारण बाजूला ठेवून द्याव्यात एवढंच जनतेचं मागणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close