गिरणी कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप

October 19, 2008 8:55 AM0 commentsViews: 11

19 ऑक्टोबर, मुंबईराष्ट्रीय मिल मजदूर संघ गिरणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार आहे. याशिवाय वृद्ध कामगारांना त्यांच्या मेडिकल उपचारांसाठीही मदत दिली जाणार आहे. ही योजना एकूण 3 कोटी रूपयांची आहे. यात दीड कोटी रूपयांची एकूण दोन फिक्स डिपॉझिट ठेवली जातील. त्यांच्या व्याजावर ही योजना चालवण्यात येईल. पहिल्या दीड कोटींतून कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप देण्यात येईल. तर, दुसर्‍या ठेवीतून कामगारांना मेडिकल उपचारांसाठी मदत देण्यात येईल. हे पैसे योग्य आणि गरजू कामगाराला मिळावेत, म्हणून एक समितीही बनवण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुका जवळ आल्यानं गिरणी कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी आरएमएमएसनं दोन योजना जाहीर केल्याचं बोललं जात आहे. ' राज्य शासनाला आम्ही विनंती करणार आहोत. हा खर्च आज जरी संघ एकट्यानेच उचलणार असला तरी यात काही भर पडते का, हे बघायला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे इतर काही विषयांसोबत हा विषयही मांडणार आहोत' ,असं म्हाडा अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितलं. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या योजनेतले पैसे हे संघाच्या व्हीआरएस घेतलेल्या कामगारांचेच पैसे आहेत. व्हीआरएस घेताना या कामगारांना मिळालेल्या एकूण रक्कमेपैकी 3 टक्के रक्कम कापून घेतली होती. हे पैसे परत मिळावेत म्हणून या कामगारांची न्यायालयीन लढाई चालूच आहे. त्यामुळेच हे पैसे परत देण्याचा हा प्लॅन म्हणजे कामगारांचे पैसे परत देण्याचाच प्रकार आहे, असं म्हटलं जातंय.

close