‘लक्ष्मीचं स्वागत’ भोवलं, निवडणूक आयोगाची दानवेंना नोटीस

December 18, 2016 1:01 PM0 commentsViews:

rao saheb banner

18 डिसेंबर : पैठणमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. ‘मतदानाच्या आधी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचे स्वागत करा,’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी काल (शनिवारी) केलं होतं. याच वक्तव्याप्रकरणी दानवे यांना रात्री उशिरा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

पैठणमध्ये पक्षाच्या प्रचारसभेत बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.. ‘निवडणुकीची आदली रात्र खूप महत्वाची असते. तुम्हाला अचानक लक्ष्मी दर्शन होईल. अशा अचानक आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करा. ती परत करू नका. पण मतदानाचा निर्णय पक्का करा,’ असं खळबळजनक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. वादग्रस्त वक्तव्य अंगाशी येताच दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

‘आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ‘आपण लक्ष्मीचे स्वागत करा, असं म्हटलं आहे. स्वीकारा असं म्हटलेलं नाही,’ असं प्रचारसभेनंतर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. दरम्यान, दानवेंचे हे विधान दुर्दैवी आहे, याबाबतची विस्तृत माहिती घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार करु असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close