रमेश बागवेंनी लपविली गुन्ह्यांची माहिती

May 15, 2010 3:00 PM0 commentsViews: 4

15 मे

राज्याचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी विधानसभेची निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या तीन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचे उघड झाले आहे.

बागवे यांनी गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडले होते.

त्यामध्ये त्यांनी कोर्टाने दखल घेतली आहे असा कोणताही खटला माझ्याविरुद्ध प्रलंबीत नाही असे म्हटले होते. पण काल स्वत:च बागवेंनी आपल्याविरुद्ध तीन गुन्हे कोर्टात प्रलंबित आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे राज्य सरकारनेच आता याबाबत काय तो खुलासा करावा, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान बागवेंवरच्या गुन्ह्यांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष

गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि पुणे पोलीस यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादात आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले आहे.

या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये सांगितले. काँग्रेसनेही या प्रकरणी रमेश बागवेंची पाठराखण केली आहे.

बागवेंवर आरोप करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी केली होती.

close