टीम इंडियाची पाठराखण

May 15, 2010 3:41 PM0 commentsViews: 7

15 मे

टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलपूर्वीच टीमला गाशा गुंडाळावा लागला. आणि त्यातच टीममधल्या सहा खेळाडूंनी रात्रीच्या वेळी एका पबमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी भांडण केल्याची बातमीही गेले काही दिवस गाजत आहे. पण टीम मॅनेजर रंजीब बिस्वाल यांनी मात्र टीमची पाठराखण केली आहे. बीसीसीआयला आज सादर केलेल्या रिपोर्टमध्ये खेळाडूंच्या मैदानावरच्या बेशिस्त खेळाला जबाबदार धरण्यात आले आहे.

बिस्वाल यांनी आज सकाळी बीसीसीआयपुढे आपला रिपोर्ट ठेवला. आयपीएलमुळे टीमच्या कामगिरीवर परिणाम झालेला नाही, असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. कॅप्टन धोणीच्या बांधिलकीविषयी शंका घेण्याचे कारण नाही असेही बिस्वाल यांनी म्हटले आहे.

या रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे, ते पाहूया…

रिपोर्टमध्ये क्रिकेट विषयक गोष्टींचाच उल्लेख आहे. आणि खेळाडूंना मैदानावरचा बेशिस्तपणा भोवला, मैदानाबाहेरचा नाही.. हे रिपोर्टमध्ये सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे पराभवासाठी आयपीएल स्पर्धेला जबाबदार धरू नये असे, रिपोर्टमध्ये ठळकपणे म्हटले आहे.

वर्ल्डकपमधील पराभवाचे कारण देताना गॅरी कर्स्टन यांनी आखलेली योजना प्रत्यक्ष मैदानावर यशस्वी करण्यात खेळाडू कमी पडले, असे बिस्वाल यांनी म्हटले. खेळाडू फिल्डिंगमध्ये कमी पडले. पण फिटनेसची समस्या नव्हती, असेही बिस्वाल यांनी लागलीच स्पष्ट केले.

शॉर्ट पिच बॉलसमोर खेळाडू बिचकताना दिसले. त्यामुळे बॅट्समननी आपल्यात तांत्रिक दृष्ट्या सुधारणा करावी, असा सल्ला रिपोर्टमध्ये बिस्वाल यांनी दिला आहे.

कॅप्टन महेंद्र सिंग धोणीला मात्र मॅनेजर बिस्वाल यांनीही क्लीन चिट दिलीय.धोणीने प्रयत्नात कसूर केली नाही, असे बिस्वाल यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

close