तुर्कीत रशियन राजदुताची गोळ्या घालून हत्या, चकमकीत हल्लेखोर ठार

December 20, 2016 2:01 PM0 commentsViews:

Russia

20 डिसेंबर : रशियाचे तुर्कस्तानातील राजदूत आंद्रेय कार्लोव्ह यांची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. हल्ल्याचा हा थरार कॅमेऱ्यात टिपला गेला. एका छायाचित्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमात तुर्की पोलिसाने गोळी घालून ही हत्या केली. हत्येनंतर हल्लेखोर ‘अलेप्पोचा बदला’ अशी घोषणाबाजी केली. भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

छायाचित्र प्रदर्शनात रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह भाषण देत होते. तेव्हा तिथे हल्लेखोर ऐल्टिंटश आला आणि त्याने घोषणाबाजी सुरू केली. त्याने पहिली गोळी हवेत झाडली आणि त्यानंतर रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांना दुसरी गोळी घातली. अतिशय जळून हा हल्ला झाल्याने कार्लोव्ह यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. हल्लेखोराची ओळख पटली आहे. मेवल्यूट मर्ट ऐल्टिंटश असं त्याचं नाव आहे. ऐल्टिंटश हा पोलिसांच्या विशेष दलात कार्यरत होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ऐल्टिंटश ठार झाला.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. तसंच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी घटन गंभीरतेने घेत परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर संस्थांची बैठक बोलावली आहे. या घटनेनंतर अंकारातील रशियाच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, रशियानं सीरीयात सुरू केलेल्या शांती प्रयत्नांना खीळ घालण्यासाठीच ही हत्या केल्याचं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलंय. कार्लोव्ह यांच्यावर हल्ला करताना हल्लेखोर अलेप्पोला विसरू नका, सिरियाला विसरू नका, अशा घोषणा देत होता.

अलेप्पोचं युद्धसंकट काय आहे? आणि त्यात रशियाचं कनेक्शन काय आहे?

 • अलेप्पो सीरियाचं महत्वाचं शहर असून आर्थिक राजधानी अशी ओळख
 • अलेप्पोची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या आसपास, बहुसांस्कृतिक शहर अशी ओळख
 • गेल्या 4 ते 5 वर्षापासून अलेप्पोत बशर अल असाद आणि बंडखोरांमध्ये यादवी
 • अरब स्प्रींगनंतर बंडखोर-असाद गटात यादवी, आतापर्यंत हजारपेक्षा जास्त मृत्यूमुखी
 • बंडखोरांना अमेरिकेचं पाठबळ तर असाद यांना रशिया, इराण यांचा
 • अलेप्पोवर बंडखोरांचं वर्चस्व, काही भाग असाद यांच्या गटाकडे
 • बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी रशियाच्या मदतीनं असाद यांचे वायुहल्ले
 • जे कुणी बंडखोरांना मदत करतील त्यांचं असाद गटाकडून शिरकान, छळ
 • गेल्या आठवड्यात बंडखोरांचं कंबरडं मोडलं, मोठ्या प्रमाणात मुलं मारली गेल्याचीही साशंकता
 • आता अलेप्पोत शस्त्रसंधी, पण शहराचा चुराडा, हजारो घरं उद्धवस्त, मुलं, माणसं बेघर
 • असाद गटाचा विजय, जगभर रशियन वायुहल्ल्याविरोधात संताप, अरबांमध्ये अस्वस्थता
 • सीरियातल्या रशियन हल्ल्याचा बदला म्हणून तुर्कित रशियन राजदुताची हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close