विदर्भात उभे राहणार संत्रा प्रक्रिया प्रकल्प

May 17, 2010 12:07 PM0 commentsViews: 44

17 मे

प्रशांत कोरटकर, नागपूर

संत्र्याच्या उत्पादनामुळे नागपूरचे नाव जगभरात ओळखले जाते. मात्र नागपुरी संत्री जागतिक बाजारपेठत नाव कमवायला जरा कमीच पडली… पण आता ही संत्री जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

विदेशी गंुतवणूकदारांच्या मदतीने विदर्भात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

लहान, गळून पडणार्‍या संत्र्याचा मोठा प्रश्न विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना सध्या भेडसावतो आहे. मात्र आता विदर्भात येऊ घातलेल्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पामुळे ही समस्या कमी होईल, अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे.

विदर्भातील संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही वर्षांपूर्वी 10 कोटी रूपये खर्चून काटोल तालुक्यात प्रक्रिया केंद्र सुरू झाले होते. पण एक महिन्यात हा प्रकल्प बंद पडला. यानंतर मागच्या वर्षी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी विदर्भात प्रकल्प उभारण्याची इच्छा व्यक्त केली.

प्रक्रिया केलेल्या संत्र्याच्या सालापासून तेल, रस तसेच चोथ्यापासून गुरांचा चारा तयार होवू शकतो. विदर्भातील नागपूर, काटोल, मोर्शी, वरूड आणि नरखेड भागात 80 हजार हेक्टर जमिनीवर संत्र्याचे उत्पादन होते. संत्र्याच्या दोन हंगामात प्रति हंगाम 8 लाख टन संत्र्याचे उत्पादन होते.

सध्या संत्रा उत्पादकांची अवस्था गंभीर आहे. पण प्रक्रिया उद्योगामुळे शेतकर्‍यांना चार पैसे अधिक मिळतील, यात शंकाच नाही.

close