कर्नाटकातील भूमिपूत्रांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण

December 22, 2016 11:00 AM0 commentsViews:

employment_6

22 डिसेंबर:  कर्नाटक सरकारकडून लवकरच राज्यातील खासगी औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भूमिपूत्रांना 100 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक असलेल्या सुधारणांचा मसुदा राज्याच्या कामगार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्द्यानुसार कर्नाटकमधील माहिती आणि तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान ही क्षेत्रं वगळता अन्य खासगी औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कन्नडिगांसाठी 100 टक्के जागा आरक्षित असतील. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.

कर्नाटक सरकारच्या औद्योगिक धोरणात दिलेल्या सवलतीमुळे माहिती व तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राला सुधारित नियमांमधून वगळण्यात आले आहे. दरम्यान, इतर क्षेत्रातील उद्योगांनी सरकारी नियम न पाळल्यास त्यांच्या सवलती रद्द केल्या जातील, अशा इशाराही कर्नाटक सरकारने दिला आहे.

कर्नाटक औद्योगिक रोजगार नियम 1961 मध्ये करण्यात येणाऱ्या या सुधारणांना अद्यापही कायदेमंत्रालयाची मान्यता मिळणं बाकी आहे. कर्नाटक औद्योगिक रोजगार नियम कायद्यातील कलम 2मध्ये या सुधारणा होणार आहेत. या प्रस्तावित सुधारणांनुसार राज्यातील ज्या औद्योगिक आस्थापनांना सरकारी धोरणातंर्गत जमीन, पाणी , वीज आणि करात सवलत देण्यात आली आहे त्या आस्थापनांना अ, ब, क, ड, इ, फ आणि जी वर्गातील नोकऱ्यांमध्ये भूमिपूत्रांना 100 टक्के आरक्षण देणे बंधनकारक राहील. औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) केंद्रीय कायदा 1946 नुसार कामगारांची कायमस्वरूपी, कंत्राटी, बदली, तात्पुरती आणि शिकाऊ अशा विभागांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गातील बहुतांश रोजगार ब्ल्यू कॉलर अर्थात अंगमेहनतीचे आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close