महिलांच्या सुरक्षेसाठी लेडीज डब्यात आता ‘टॉकबॅक’ सुविधा

December 22, 2016 11:33 AM0 commentsViews:

1_kamumbai019

22 डिसेंबर  :  मुंबईत लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर आता टॉकबॅक सुविधा बसवण्यात येणार आहे. यामुळे  महिला प्रवाशांना आणीबाणीच्या परिस्थितीत गार्डशी संपर्क साधता येईल. त्यामुळे महिलांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे. सध्या मार्च महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेवरच्या दोन लोकल गाड्यांत महिलांच्या 6 डब्यांमध्ये ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या महालक्ष्मी कारशेडमध्ये ही प्रणाली बसवण्याचे काम सुरू आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे परिसरात महिलांवरील अत्याचारांमध्ये तसेच सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यातच लोहमार्ग पोलिसांची संख्या तुटपुंजी आहे.  रात्रीच्या वेळेला महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न जास्त गंभीर होतो. त्यामुळे ही प्रणाली बसवण्यात येणार आहे, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं आहे.

ही प्रणाली सध्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर अस्तित्वात आहे. मेट्रोच्या दरवाजांजवळ हे बटण आहे. त्याशिवाय सध्या चाचण्या सुरू असलेल्या एसी लोकल गाडीतही टॉकबॅक प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबर नव्याने येणाऱ्या प्रत्येक गाडीत ही प्रणाली जोडली जावी, यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्याशिवाय 50 गाड्यांत सीसीटीव्ही बसवायला सुरुवात केली आहे.

टॉकबॅक प्रणाली काय आहे?

टॉकबॅक प्रणालीद्वारे गाडीतील प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत गार्डशी संपर्क साधता येतो. त्यासाठी डब्याच्या दरवाजाजवळ एक काळे बटण लावण्यात येते. हे बटण दाबल्यानंतर गार्डच्या केबिनमध्ये असलेल्या गार्डशी ध्वनिक्षेपकाद्वारे बोलता येऊ शकते. कोणत्या डब्यातील बटण दाबले गेले आहे, हे गार्डला त्याच्यासमोर असलेल्या पटलावरून सहज लक्षात येते. त्यामुळे गार्डही प्रवाशांशी संपर्क साधू शकतो. गार्ड प्रवाशांपर्यंत तातडीने मदत पोहोचवू शकतो.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे

पश्चिम रेल्वेने महिलांच्या ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सुरुवात केली आहे.  त्यापैकी सात गाड्यांमधील प्रत्येकी तीन अशा 21डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झालं असून  उर्वरित डब्यांमधील कामही फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close