मान्सून अंदमानमध्ये धडकला

May 18, 2010 9:46 AM0 commentsViews: 8

18 मे

मागचे वर्ष दुष्काळाच्या छायेत गेल्याने तहानलेल्या शेतीसह सर्वसामान्यांनाही दिलासा देण्यासाठी यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे.

काल अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळल्या. त्यामुळे केरळमध्येही मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याची शक्यता आहे.

20 मेपर्यंत मान्सून अंदमानच्या किनार्‍यावर धडकणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण पावसाने अंदमानच्या किनार्‍यावर तब्बल 3 दिवस आधी हजेरी लावली आहे.

नैऋत्य मोसमी वार्‍यांचा प्रवाह अंदमान-निकोबार बेटे, अंदमान समुद्रात आणि बंगालचा उपसागर या भागात सक्रीय झाला आहे.

तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे मान्सूनचे केरळमध्येही वेळेआधीच म्हणजे 30 मे आधी आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान आंध्रप्रदेशात वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

विशाखापट्टणमच्या सायक्लॉन वॉर्निंग सेंटरने हा ऍलर्ट जारी केला आहे. लैला नावाचे हे वादळ आज रात्री किंवा उद्या सकाळी आंध्रच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

close