शिवा होण्याची माझी लायकी नाही, पण जिवा होण्याची संधी द्या -मुख्यमंत्री

December 24, 2016 7:46 PM0 commentsViews:

cm_fadanvis_bkc23 डिसेंबर : मी शिवा तर होऊ शकत नाही. ती माझी लायकी नाही. पण मला किमान जिवा होण्याची संधी द्यावी आणि या महाराष्ट्राची आणि शिवरायांची सेवा करण्याची संधी द्यावी असं साकडंच तुळजाभवानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलंय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात तुम्हाला तुळजा भवानींची तलवार पेलवणार का ? असा प्रश्न केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पांचं उद्घघाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी जोरदार भाषण करून उपस्थितींची मनं जिंकली. आजच्या दिवशीच शिवरायांनी मालवणजवळ सिंधुदुर्ग किल्ल्याचं जलपूजन केलं होतं. त्याचंचं औचित्य साधून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन आणि भूमिपूजन पार पडलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

आम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद मागितला होता तो तुम्ही दिला. तुम्ही दाखवलेला विश्वासामुळे आम्ही सत्तेत आलोय. सत्तेवर आल्यावर आम्ही छत्रपतींचे सेवक आहोत आणि म्हणून शिवरायांचं अरबी समुद्रात स्मारक  उभारण्याचं ठरवलं. हे जगातलं सर्वात उंच असणार आहे. अमेरिका स्टॅच्यू अॅाफ लिब्रटी ही उंच वास्तू आहे पण आता भारत शिवरायांच्या भव्य आणि उंच स्मारकामुळे जगात ओळखला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
तसंच शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली. स्वराजासाठी हे मुठभर मावळे मुघलांवर तुटून पडले. आज शिवरायांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राला पुठे नेण्याचं संकल्प मी करतोय. काही लोकं या ठिकाणी प्रश्न विचारता की स्मारक कशासाठी ? पण तारीख “इस बात की ग्वाह हैं. इतिहास को जो भूल जाते हैं, उन्हे वर्तमान तो होता हैं पर भविष्य नही होता.” अशी शायरीच मुख्यमंत्र्यांनी करून विरोधकांना टोला लगावला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवस्मारक बांधणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही असं सांगत तुम्हाला भवानी मातेची तलवार पेलवणार का ? असा सवाल केला होता.

भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी  उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. आई तुळजा भवानीला एकच साकडं घालतो, मी शिवा तर होऊ शकत नाही ती माझी लायकी नाही पण मला किमान जिवा होण्याची संधी द्यावी. या महाराष्ट्राची आणि शिवरायांची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती तुळजाभवानीकडे करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close