द्राक्ष उत्पादकांनी हायवे रोखला

May 18, 2010 3:27 PM0 commentsViews: 21

18 मे

निर्यातीसाठीचे निकष पूर्ण न केल्यामुळे नाशिकची द्राक्षे युरोपमध्ये नाकारली गेली आहेत. यामुळे अडचणीत आलेल्या नाशिकमधील शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा रस्ता रोखून धरला.

गेल्या दोन महिन्यांपासून द्राक्ष निर्यातीचा प्रश्न चिघळला आहे. युरोपियन बाजारात बदलेले निकष अपेडाने कळवले नसल्याने कोट्यावधींची द्राक्षे युरोपात नाकारली जात आहेत.

तब्बल पावणे चार हजार कन्टेनर्स खरेदीविना पडून आहेत. त्यात 2 हजार 700 कंटेनर नाशिकची द्राक्षे आहेत. याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे.

निर्यातदारही भरडले

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांसोबतच निर्यातदारही यात भरडले जात आहेत. अपेडाच्या या चुकीमुळे कोट्यावधींचा माल धोक्यात आला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याला जबाबदार असलेले अपेडाचे अधिकारी निर्यातदार किंवा शेतकर्‍यांशी बोलायलाही तयार नाहीत. शेवटी निर्यातदारांनी स्वत: युरोपचा दौरा करून तेथील व्यापार्‍यांच्या माध्यमातून सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेडा त्यांची जबाबदारी पार पाडत नसल्याची यांची तक्रार आहे.

भारतातून निर्यात झालेल्या द्राक्षांमध्ये क्लोरोमॅकवेट हा घटक आढळल्याने ती युरोपात स्वीकारली गेली नाहीत. क्लोरोमॅकवेट न वापरण्याची अट युरोपने 2009मध्ये जाहीर केली होती.

मात्र केंद्र सरकारच्या अपेडाने ती शेतकर्‍यांपर्यंत आणि निर्यातदारांपर्यंत पोहोचवलीच नाही. अन्यथा द्राक्ष निर्यात करण्यापूर्वी शेतकरी आणि निर्यातदार या दोघांनीही अपेडाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले होते.

द्राक्ष निर्यातीचे निकष –

97 रासायिनक घटकांचे परीक्षण

अपेडाने नियुक्त केलेल्या प्रयोगशाळेचे अहवाल

अमेरिका आणि नेदरलॅण्डच्या निर्यातीसाठीचे प्रमाणपत्र

अपेडाच्या सूचनांनुसार क्वालिटी ग्रेडींग

सॅनेटरी सर्टिफिकेट

एक्साईज अधिकार्‍यांच्या साक्षीने मालाचा कंटेनरमध्ये भरणा

close