नक्षली हल्ल्यात 4 जवान शहीद

May 19, 2010 9:49 AM0 commentsViews: 6

19 मे

नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पंश्चिम बंगालमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाने सीआरपीएफच्या जवानांचे वाहन उडवले.

या हल्ल्यात चार जवान शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.

पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये ही घटना घडली.

भूसुरुंगामुळे रेल्वे घसरली

नक्षलवाद्यांनी पश्चिम बंगालमधील खातपोरा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट केला. त्यामुळे टाटानगर – हावडा मार्गावरची मालगाडी रुळांवरून घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचा ड्रायव्हर आणि त्याचा सहकारी जखमी झालेत.

स्फोटामुळे या मार्गावरची अप-डाऊन वाहतूक विस्कळीत झाली. दूरच्या पल्ल्याच्या 7 गाड्या या दुर्घटनेमुळे विविध स्टेशन्सवर खोळंबल्या. अहमदाबाद एक्सप्रेस आणि पुरुषोत्तम एक्सप्रेस दुसर्‍या मार्गावरून वळवण्यात आल्यात.

रेल्वेचे अधिकारी आणि सुरक्षा जवानांनी घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

नक्षलवाद्यांचे बंदचे आवाहन

नक्षलवाद्यांनी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तिसगड, ओरिसा या राज्यांत कालपासून बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी मध्यप्रदेशातील गया मुगल सराया या ठिकाणी ठेवलेले 2 बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले.

पण त्यामुळे या नक्षल प्रभावित रेल्वे मार्गावरील बाकीच्या गाड्यांचे मार्ग मात्र बदलण्यात आले. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्यात. पूर्व मध्य रेल्वेने पलामू एक्सप्रेससह सहा गाड्या बुधवारपर्यंत रद्द केल्यात.

जम्मूतवी एक्सप्रेससह पाच गाड्यांचे मार्ग बदललेत. ओरिसा आणि बिहार या भागात पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. छत्तिसगडमध्ये या बंदचा परिणाम सगळ्यात जास्त प्रमाणात जाणवत आहे. छत्तिसगडच्या ग्रामीण भागात नक्षलविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.

कारवाईची मागणी

नक्षलवाद ही राष्ट्रीय समस्या झाली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी केली आहे.

close