‘नोटबंदीच्या ५० दिवसांनंतर पंतप्रधान राजीनामा देणार का ?’

December 27, 2016 8:46 PM0 commentsViews:

rahul_mamata_vs_modi२७ डिसेंबर 2016 : नोटंबदीची मुदत ३० डिसेंबरला संपणार असल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांसह दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदीं त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अस्वस्थ झालेत, असं राहुल गांधींनी म्हटलंय तर आता नोटबंदीच्या ५० दिवसांनंतर पंतप्रधान राजीनामा देणार का, असा सवाल ममतांनी केलाय.

पंतप्रधानांनी त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर द्यावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी पुन्हा केलीय. त्यावर राहुल गांधींमध्ये प्रगल्भतेचा अभाव आहे, अशी टीका भाजपने केलीय.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींना सहारा आणि बिर्ला ग्रुपकडून कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. याबद्दलच्या डायरी आणि टेप्स खऱ्या आहेत, असा दावा राहुल गांधींनी केलाय.

नोटबंदीमुळे भ्रष्टाचार रोखला गेला नाही. याउलट सामान्य लोकांकडे पैसेच उरले नाहीत, याची आठवण राहुल गांधींनी करून दिली. नोटबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे देशात आर्थिक आणिबाणीची स्थिती आहे, अशी टीका ममता बॅनर्जींनी केलीय.

गेल्या ५० दिवसांत आपला देश २० वर्षांनी मागे गेलाय, असं ममता म्हणाल्या. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिला नाही तर लोक तुम्हाला सत्तेवरून खाली खेचतील, असा इशारा ममतांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close