अखिलेश यादव ‘सायकल’ सोडणार ?,167 उमेदवार उतरवले मैदानात

December 29, 2016 7:37 PM0 commentsViews:

akhilesh yadav vs shivpal yadav29 डिसेंबर : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातली यादवी अजूनही शमलेली नाही. समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत अखिलेश समर्थकांना डावललं गेलंय. त्यामुळे अखिलेश यादव यांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. अखिलेश यादव यांनी आपल्या 167 उमेदवारांची नवी यादी जाहीर केलीय.

मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी ३२५ उमदेवारांची यादी जाहीर केली. पक्षाने प्रसिद्ध केलेल्या या उमेदवारांच्या यादीत अखिलेश यादव यांच्या समर्थकांची नावं नाहीयेत.

अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांची आज मुलायमसिंह यांच्या लखनौमधल्या घरी बैठक झाली. या चर्चेत काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे अखिलेश यादव या निवडणुकीत खरंच स्वतंत्रपणे लढणार का ?या चर्चांना उधाण आलंय.

अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यामधले मतभेद आता जगजाहीर आहेत. काका-पुतण्याच्या या तंट्यात मुलायमसिंह यादव यांनी शिवपाल यादव यांच्या बाजूने झुकतं माप दिलंय. शिवपाल यादव हे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण पक्षात बहुतांश आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय झाला तर अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस असेल. अशा स्थितीत अखिलेश यांच्या समर्थक आमदारांची संख्या कमी करण्याचा शिवपाल यादव यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे  शिवपाल यादव यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा डाव खेळलाय.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय होणार का ? हा कळीचा मुद्दा आहेच. पण त्याहीआधी समाजवादी पक्षात कौन बनेगा मुख्यमंत्री ? ही शर्यत जोरदार रंगलीय. नव्या वर्षांत उत्तर प्रदेश निवडणुकांचं हे महाभारत आणखी शिगेला पोहोचणार, अशीच चिन्हं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close