#फ्लॅशबॅक2016 : साहित्य क्षेत्रासाठी कसं राहिलं वर्ष ?

December 29, 2016 11:52 PM0 commentsViews:

मराठी आणि पंजाबी साहित्याचा मानबिंदू म्हणून यंदा पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलन झालं. पंजाबमधल्या घुमानमध्ये साहित्य संमेलनाच्या वेळेस महाराष्ट्रात पंजाबी साहित्य संमेलन व्हावं असं निमंत्रण देण्यात आलं होतं. मराठी आणि पंजाबी साहित्य क्षेत्रातले अनेक दिग्गज या संमेलनाला आवर्जून उपस्थित होते. डॉ. सुखविंदर सिंग हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हेही या पंजाबी संमेलनाला आवर्जून हजर होते. सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी या संमेलनाचं आयोजन केलं होतं. ग्रंथदिंडी काढून पारंपरिक पद्धतीनं या पंजाबी संमेलनाची सुरुवात करण्यात आली होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी यावेळेला पंजाबी भांगडाही केला. पंजाबी संस्कृतीचं, साहित्याचं दर्शन या संमेलनात घडलं.

माधुरी पुरंदरे  यांना बिग लिटील बुक अवॉर्ड

लहान मुलांसाठी, त्यांचं भावविश्व समृद्ध करणारी पुस्तकं लिहिणाऱ्या माधुरी पुरंदरे यांना यावर्षी एका विशेष सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. टाटा ट्रस्टच्या पराग या उपक्रमातर्फे यंदापासून सुरु झालेल्या बिग लिटील बुक अवॉर्ड हा पहिला पुरस्कार माधुरी पुरंदरे यांना देण्यात आला. राधाचं घर, यश, एक होता राजा,,,वाचू आनंदे अशी अनेक लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी आनंद देणारी पुस्तकं लिहील्याबद्दल माधुरी पुरंदरे यांचा हा गौरव करण्यात आला.मराठीतल्या कोसला, बलुतं या पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे. 2014 मध्ये त्यांना बालसाहित्यातल्या योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे.

‘लस्ट फॉर लालबाग’

या वर्षातलं गाजलेलं आणि विक्रमी खप असलेलं पुस्तक म्हणजे विश्वास पाटील यांची कांदबरी लस्ट फॉर लालबाग. मुंबईतल्या लालबाग-परळमधल्या गिरणी कामगारांच्या जीवनावरच्या या कादंबरीनं प्रकाशनापूर्वीच उत्सुकता निर्माण केली होती. प्रकाशनानंतरही या कादंबरीनं वाचकांची पसंती मिळवली आणि त्याची तडाखेबंद विक्री झाली. लालबाग -परळमधलं गिरणी कामगारांचं रोजचं आयुष्य, त्यांच्या समस्या, त्यांची सुखदु:खं या कादंबरीतून मांडली गेलीयेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close