पेट्रोल, डिझेल महागणार

May 19, 2010 2:04 PM0 commentsViews: 2

19 मे

राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

येत्या 1 जून पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्यासाठी राज्यातील काही शहरे निवडण्यात आली आहेत. ऐन महागाईच्या काळातच सरकारने हे पाऊल उचलल्याने नागरिकांमधून त्याला विरोध होत आहे.

पुण्यात सर्व पक्षीय विरोध

1 जून पासून पुण्यात पेट्रोलच्या दरात 50 पैसे तर डिझेलच्या दरात 1 रूपया 20 पैशांची वाढ करण्याचा निर्णय राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केला आहे.

गेल्या 6 वर्षात एमएसआरडीसीने पुण्यात बांधलेले फ्लायओव्हर तसेच रस्त्यांची केलेली कामे, यावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी हा इंधनावर सेस लावला जात आहे.

महागाईने त्रासलेल्या पुणेकरांनी या संभाव्य दरवाढीला विरोध केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या दरवाढीवर आक्षेप घेतला आहे.

व्हॅटवरच्या जकातीमुळे पुण्यात इतर शहरांपेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर आधीच जास्त आहेत. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, वीजदरवाढ आणि आता येऊ घातलेली संभाव्य पेट्रोल-डिझेल दरवाढ… सामान्य पुणेकर नागरिकांनी हा अन्याय असल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद शहरातही 1 जूनपासून पेट्रोलच्या दरात 50 पैशांनी तर डिझेलच्या दरात 1 रुपया 20 पैशांनी वाढ होणार आहे.

नंदूरबार शहरात निदर्शने

नंदूरबार शहरातून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला मोठा विरोध होत आहे. प्रवासी संघटनेने पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या घरासमोर या दरवाढीविरोधात निदर्शने केली.

तसेच आमदार पद्माकर वळवी यांच्या घरासमोरही काळ्या फिती बांधून निधेष व्यक्त केला. 1 जूनपासून इथे पेट्रोलसाठी 50 पैशांची तर डिझेलसाठी 1 रुपये 26 पैशांची दरवाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.

close