सपात ‘दंगल’, अखिलेश यादवांची हकालपट्टी

December 30, 2016 7:32 PM0 commentsViews:

akhilesh_yadav_sp30 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून सपामध्ये सुरू असलेल्या शितयुद्धाने आता नवे रुप धारण केले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांना निलंबित करण्याची घोषणा केली. अखिलेश यांच्यासोबत त्यांचे काका आणि कट्टर समर्थक रामगोपाल यादव यांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय.

याआधी गुरुवारी अखिलेश यादव यांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. उमेदवारांच्या यादीत त्यांच्या समर्थक उमेदवारांना डावललं गेल्यामुळे अखिलेश यादव नाराज आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या २३५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केलीय.

अखिलेश यादव यांचे समर्थक रामगोपाल यादव यांनी आता यामध्ये कोणताही तडजोडीचा मार्ग उरलेला नाही, असं म्हटलंय. ज्यांचा अखिलेश यादव यांना विरोध आहे त्यांना विधानसभेची दारं बंद झालीयत, असं वक्तव्यही त्यांनी केलं. रामगोपाल यादव यांनी पक्षातर्फे पत्रक काढून कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावलीय. त्यासोबतच समाजवादी पक्षामध्ये फूट पडलेली नाही, असंही ते म्हणाले.

मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी ३२५ उमदेवारांची यादी जाहीर केली. यामध्ये अखिलेश यांच्या समर्थकांची नावं नव्हती.अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांची गुरुवारी मुलायमसिंह यांच्या लखनौमधल्या घरी बैठक झाली. या चर्चेत काहीही तोडगा निघू शकला नाही.

अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यामधले मतभेद आता जगजाहीर आहेत. काका-पुतण्याच्या या तंट्यात मुलायमसिंह यादव यांनी शिवपाल यादव यांच्या बाजूने झुकतं माप दिलंय. शिवपाल यादव हे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण पक्षात बहुतांश आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना आहे.

उत्तर प्रदेशातली यादवी  तर शिगेला पोहोचलीय. पण त्याहीपेक्षा ही मुलायमसिंह यादव यांची नवी राजकीय खेळी आहे का याबद्दल चर्चा रंगलीय. अखिलेश यादव यांच्या २३५ उमेदवारांच्या यादीत १८७ उमेदवार असे आहेत की ज्यांचं नाव मुलायमसिंह यादव यांच्या यादीतही आहे. त्यामुळेच आता हे उमेदवार नेमके कुणाच्या बाजूने जातात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

समाजवादी पक्षातल्या अंतर्गत कलहाचा फायदा भाजप आणि मायवतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जातेय. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात ४०३ जागांसाठी ही निवडणूक होतेय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close