#फ्लॅशबॅक2016 : मराठी चित्रपटसृष्टी हे वर्ष ठरलं ‘सैराटमय’

December 30, 2016 8:37 PM0 commentsViews:

30 डिसेंबर: 2016 मराठी सिनेमांसाठी खूप चांगलं आणि यशस्वी ठरलं. रिलीज झालेल्या अनेक सिनेमांची चर्चा तर प्रेक्षकांमध्ये होतीच. पण थिएटर्समधले शोजही हाऊसफुल जात होते.

2016 हे वर्षं ख-या अर्थानं ‘सैराट’ ठरलं ते नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमामुळे…अजय-अतुलचं संगीत, नागराज मंजुळेचं दिग्दर्शन, रिंकू-आकाश या नव्या जोडीचा लक्षणीय परफॉर्मन्स यामुळे सैराटनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही ‘सैराट’ आवर्जून पाहिला. आर्ची-परशाची प्रेमकहाणी लोकप्रिय झाली आणि प्रेक्षक सिनेमागृहातही झिंगाटच्या तालावर नाचू लागले.एकंदर 2016 सैराट ठरलं यात शंकाच नाही. सैराटनं 95 कोटींचा टप्पा गाठला.

 

नटसम्राट

या वर्षाची सुरुवात केली नटसम्राट सिनेमाने…. वि.वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले नटसम्राट या अजरामर नाटकावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा साकारला. नटसम्राट सिनेमात अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिकेत होते. नाना बरोबर विक्रम गोखले, रीमा ह्यांच्याही भूमिका होती. नटसम्राटने तब्बल 40 कोटींची कमाई केली होती.

 

व्हेंटिलेटर

या वर्षी आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरनं मराठी सिनेमात भूमिका केली. आणि प्रियांका चोप्रानं मराठी सिनेमाची निर्मिती केली. त्यांचा व्हेंटिलेटर पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. अनेक जण अंतर्मुख झाले. व्हेंटिलेटरलाही चांगलं यश मिळालं.

लाल इश्क

बाॅलिवूडच्या अनेक दिग्गजांना मराठी सिनेमाचं आकर्षण आहे. याही वर्षी संजय लीला भंसाळीनं लाल इश्क सिनेमाची निर्मिती केली. स्वप्निल जोशी,अंजना शुक्ला यांची जोडी होती. सिनेमा रोमँटिक असूनही फारसा चालला नाही.

एक अलबेला

बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालननं यावर्षी मराठी सिनेमात काम केलं. एक अलबेला सिनेमात ती गीता बाली बनली होती. सिनेमातले तिचे ठुमके लक्षवेधक ठरले.

वायझेड

मराठी सिनेमा हा नेहमीच प्रयोगशील राहिलाय.याही वर्षी समीर विद्ध्वांसनं वायझेड सिनेमा आणून वेगळा प्रयोग केला तो कथेत. स्वत:तला वायझेड कसा शोधायचा हे सिनेमानं सांगितलं. सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे आणि सागर देशमुख यांच्या तोडीस तोड अभिनयानं सिनेमाला चार चाँद लागले.

फुंतरू

या वर्षी मराठीत एका सायफाय सिनेमाचाही प्रयोग झाला. तो म्हणजे फुंतरू. तर वन वे तिकीट हा सिनेमा युरोपला क्रूझवर शूट झाला.

प्रेक्षकांना आवडतील असे अनेक विषय मराठी सिनेमानं दिले. मग तो वंदना गुप्ते,दिलीप प्रभावळकर यांचा कौटुंबिक सिनेमा फॅमिली कट्टा असो, नाहीतर सोनाली कुलकर्णीचा पोश्टर गर्ल. अंकुश चौधरीचा गुरू,घंटा अशा अनेक सिनेमांनी वेगळं देण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मराठी सिनेमांसाठी 2016 नक्कीच समाधान देणारं ठरलं. आणि 2017कडून जास्त अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

यावर्षी हे चित्रपट गाजले

सैराट
नटसम्राट
जाऊंदयाना बाळासाहेब

हाल्फ तिकीट
लाल इश्क
रेती

वायझेड
घंटा
गुरू

वन वे तिकीट
एक अलबेला
फोटोकॉपी

पोश्टर गर्ल
वजनदार
फुंतरू – सायफाय

लालबागची राणी
फॅमिली कट्टा
किरण कुलकर्णी किरण कुलकर्णी

व्हेंटिलेटर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close