शेतकरी, गरिबांना मोदींकडून नववर्षाची भेट

December 31, 2016 9:25 PM0 commentsViews:

narendra_modi431 डिसेंबर :  8 नोव्हेंबरच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पंतप्रधान मोदी आज काय बोलणार ? याबद्दल अवघ्या देशाला उत्सुकता लागली होती. पंतप्रधान मोदी आज पुन्हा नोटबंदीबद्दल काही बोलता की काही वेगळा निर्णय जाहीर करात याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. पण, पंतप्रधानांनी सर्वांना खूश करत नववर्षाची भेट देऊन ‘शेवट’ गोड केलाय. गृह कर्जदार, शेतकरी, लघू उद्योजक,गर्भवती महिला आणि ज्येष्ठांसाठी पंतप्रधानांनी  नव्या घोषणा केल्या आहेत. आजपर्यंत ‘अच्छे दिन’ येणार असं स्वप्न मोदींनी दाखवलं होतं त्याची आज एकाप्रकारे पूर्तता केलीये.

नोटंबदीची मुदत संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केलं. नोटबंदीच्या निर्णयानंतर लोकांना आपले पैसे काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं याची मला जाणीव आहे, मला याबद्दल शेकडो पत्रं आली, असं पंतप्रधान म्हणाले. पण या  काळात सरकारी अधिकारी, बँक कर्मचारी यांनी जे गैरव्यवहार केले त्यांची खैर नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सत्य आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. चांगल्या कामासाठी नागरिक आणि सरकार एकत्र येऊन काम करतायत,इतिहासात याला तोड नाही या शब्दांत पंतप्रधानांनी नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं. आपलं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे, असं देशभरातल्या 24 लाख लोकांनी मान्य केलं. एवढ्याच लोकांचं उत्पन्न जास्त असेल तर मग इतरांकडे 4-5 गाड्या कुठून आल्या, असा सवालही मोदींनी केला.

नवीन वर्षात बँकिंग व्यवस्थेची स्थिती पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रामुख्याने केलं जाईल आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचा आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नोटबंदीच्या काळात देशवासीयांनी ज्या संकटाला तोंड दिलं, सहन केलं ते कौतुकास्पद आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही वर्षात काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्थेत जास्त चालत होता. अन्य देशातही इतकी समांतर अर्थव्यवस्था नव्हती हे पंतप्रधानांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि काळा बाजार वाढल्यामुळे गरिबांची लुबाडणूक होत होती. ड्रग्ज बाळगणारे लोक आणि दहशतवादी काळ्या पैशावर अवंलबून असतात. पण नोटबंदीच्या निर्णयामुळे या सर्वांना उद्धवस्त केलंय, असा दावाही पंतप्रधानांनी केला.

अर्थव्यवस्थेच्या बाहेर गेलेला पैसा बँकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत परत आलाय. बँक, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी या काळात खूप मेहनत घेतली, ते कौतुकास्पद आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतानाच मोदींनी गृहकर्ज, शेतकऱ्यांचं पीककर्ज, गर्भवती महिलांसाठीच्या अनुदानात वाढ अशा महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरच्या व्याजामध्ये वाढ करून त्यांनी सामान्य लोकांना दिलासा दिलाय.

पंतप्रधानांनी या भाषणात सरकारच्या काही योजना जाहीर केल्यायत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सरकारने 2 नव्या योजना आणल्यायत. 2017 मध्ये शहरात 9 लाखांच्या गृहकर्जावर 4 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. तर 12 लाखांच्या गृहकर्जावर 3 टक्क्यांची सूट देण्यात आलीय. ग्रामीण भागात घरबांधणी किंवा घराचा विस्तार करण्यासाठी 2 लाखांच्या कर्जावर व्याजात 3 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठीही काही योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांचं पीककर्जावरचं 60 दिवसांचं व्याज माफ करण्यात येईल, असं ते म्हणाले. त्यासोबतच 3 कोटी किसान क्रेडिट कार्ड रुपे कार्डात बदलण्यात येणार आहेत.

लघुउद्योगांना जास्त कर्ज देण्यात येणार आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी 2 कोटींची क्रेडिट गॅरंटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 लाखांच्या ठेवीवर 8 टक्के व्याज देण्यात येणार आहे. तसंच गर्भवती महिलांसाठीही सरकारने एक देशव्यापी योजना आणलीय. गर्भवती महिलांसाठी 6 हजारांचं अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात
जमा होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close