अनुराग ठाकूर ‘आऊट'; सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवलं

January 2, 2017 11:28 AM0 commentsViews:

BCCIANURAG_BANNER

02 जानेवारी: लोढा समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना आज सोमवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सुप्रीम कोर्टाने पदावरून हटवलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे क्रिकेटवर्तुळात तसंच राजकारणात खळबळ उडाली आहे.

 क्रिकेट खेळात पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यात बीसीसीआय आणि स्थानिक क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशांचे बीसीसीआयने पालन केलेले नाही. त्यामुळे अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटवण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हटलं.

कोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच, सुप्रीम कोर्टासमोर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस ठाकूर आणि शिर्के यांना देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 19 जानेवारीला होणार आहे.

गेल्या वर्षी १८ जुलै रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावण्यांनंतर लोढा समितीने 14 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आपला तिसरा अहवाल सादर केला होता. लोढा समितीच्या ठाम भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टानेही आपला आदेश कायम ठेवत बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या वारंवार सुचनेनंतरही बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यास नकार दिल्याने अखेर आज कोर्टाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटवलं आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close