‘लैला’ धडकले; मंदावले

May 20, 2010 3:48 PM0 commentsViews: 1

20 मे

लैला वादळाने आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या बापताला या भागाला धडक दिली आहे.

पण संपूर्ण किनारपट्टी ओलांडायला लैलाला अजून काही वेळ लागणार आहे.

दरम्यान या वादळाचा जोर मंदावला आहे. प्रति तासाला 120 मैल वैगाने वाहणारे वारे आता तासाला 85 ते 100 मैलांपर्यंत खाली आलेत.

आंध्रमधील लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आंध्र सरकारने केले आहे. वादळाचा धोका असलेल्या भागातील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बचावकार्यासाठी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स सज्ज ठेवण्यात आले आहे. लष्कराला किनारपट्टीच्या भागात पाठवण्यात आले आहे. ओरिसा आणि पश्चिम बंगालही वादळाच्या रडारवर आहेत. या राज्यांना वादळ उद्या धडकण्याची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस

वादळाचा जोर मंदावला असला तरी आंध्र आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. काल रात्रीपासून ही संततधार सुरू आहे. त्यात आतापर्यंत 9 लोकांचा बळी गेला आहे. त्यातील तिघे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहेत. कर्नाटकातही वादळी पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

किनारपट्टीवरील 9 जिल्ह्यांमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आंध्रप्रदेशातील सखल भागातील 50 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. विशाखापट्टणम आणि विजयवाडाला जाणार्‍या रेल्वे धीम्या गतीने जात आहेत.

आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नई, नागापट्टीणम, कुड्डलोर, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या किनारपट्टीच्या भागात रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे.

ओरिसालाही फटका बसण्याची शक्यता

पश्चिम बंगाल आणि ओरिसालाही लैला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोर्‍यात आणि ओरिसातील दक्षिण आणि उत्तरेकडच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

येत्या 12 तासांत पाऊस येण्याची शक्यता आहे. पण चिंतेचे काही कारण नसल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. कोलकाता आणि पूर्व मिदनापूरच्या तसेच उत्तर आणि दक्षिण परगणाच्या काही भागात, हावडा, हुगळी आणि नादिया परिसरातही ऍलर्ट देण्यात आला आहे.

close