अण्णांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार -शरद पवार

January 4, 2017 8:23 PM0 commentsViews:

anna_vs_pawar04 जानेवारी : अण्णा समाजसेवक आहेत म्हणून किती दिवस गप्प बसायचं असं म्हणत अण्णांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा गांभिर्याने विचार करतोय असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं.

राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या तोट्यात आणून नंतर त्याची बेकायदा आणि कवडीमोल भावानं विक्री करुन सहकार चळवळीचं प्रचंड नुकसान केल्याची तक्रार करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह इतर राजकीय नेत्यांची घोटाळा केला असा आरोप अण्णा हजारे यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीये. या सगळ्या प्रकरणात सरकारी तिजोरीचं २५ हजार कोटी रुपयांचं नुकसान करत राज्यावरही एक लाख कोटी रुपयाचं कर्ज लादलं असा गंभीर आरोप या याचिकेत केलाय.

अण्णा हजारेंनी सहकारी कारखानदारीसंदर्भात केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांवर शरद पवार आता चांगलेच संतापलेत. जनसेवक आहेत म्हणून किती काळ गप्प बसायचं.  यावेळी मी अण्णांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा गांभिर्याने विचार करतोय, असंही पवारांनी म्हटलंय.

तसंच निवडणुकीच्या तोंडावर बजेट मांडू नका, यासाठी आपण सर्व विरोधीपक्षांची बोलून धोरण ठरवणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची मानसिकता ही विरोधकांसारखी असून ही जमेची बाजू आहे असा टोलाही शरद पवारांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close