पेट्रोलपंपांवर डेबिट आणि क्रेडिट कार्ड चालणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

January 9, 2017 8:59 AM0 commentsViews:

cashless story prav - Copy_1

09 जानेवारी : पेट्रोल पंप चालक सध्यातरी डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारणार आहेत. पेट्रोल पंपांवर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांकडून शुक्रवारपर्यंत मागे घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपांवर डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करता येणार आहेत. तसंच,13 जानेवारीपर्यंत यावर तोडगा काढा, अशी मागणी पेट्रोल पंप मालकांनी केलीय.

याआधी डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यावर पेट्रोल पंप चालकांना बँकेला 1 टक्का ट्रांझॅक्शन टॅक्स द्यावा लागत होता. मात्र सरकारच्या मध्यस्तीनंतर शुक्रवारपर्यंत अतिरिक्त कर न लावण्याची भूमिका बँकांकडून करुन घेण्यात आली आहे. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतला आहे.

नोटाबंदीनंतर पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. या व्यवहारांवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांकडून घेण्यात आला. त्यामुळे पेट्रोल पंपांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्याने ऑल इंडिया पेट्रोल डिझेल पंप डीलर्सचे असोसिएशनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसंच हा चार्ज रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे. इतर दुकानदार आणि व्यापाऱ्यांना हा चार्ज द्यावा लागत नाही, मग आम्हीच का द्यायचा, अशी भूमिका  पेट्रोल पंप मालकांनी घेतली आहे.

बँकांच्या एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारणीला विरोध म्हणून पेट्रोल पंप चालकांनी थेट डेबिट क्रेडिटद्वारे पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, पेट्रोल पंप चालक आणि बँकांच्या या वादात पेट्रोल कंपन्यांचं मोठं नुकसान होणार असल्याने पेट्रोल मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप केला. सरकारच्या हस्तक्षेपानंतर बँकांनी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय शुक्रवारपर्यंत मागे घेतला. अखेर रात्री उशीरा याबद्दलचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याच्या निर्णयाला स्थिगीती दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close