जवान तेज बहादूरवरच बेशिस्त, बीएसएफचं स्पष्टीकरण

January 10, 2017 10:44 AM0 commentsViews:

yadav-new-580x360

10 जानेवारी : बहादूर यादव यांनी बीएसएफ जवानांना कोणत्या दर्जाचं खायला दिलं जातं याचा पर्दाफाश केलाय. सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांना सकाळी नाष्ट्यासाठी अर्धवट जळालेला पराठा आणि पाण्यासारखा चहा एवढच मिळत असल्याचं उघड केलंय. तेज बहादूर यादव यांचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग आलीय आणि चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

ही दृश्यं बघितली आणि त्यातली हदयद्रावक स्थिती ऐकली तर संताप आल्याशिवाय राहाणार नाही. एखाद्या कैद्याला दिलं जावं  अशा पद्धतीचं जेवण सिमेवर गस्त घालणाऱ्या बीएसएफच्या जवानांना दिलं जात असल्याचं खुद्द एका जवानानेच उघड केलंय.

हा व्हीडीओ तयार केलाय तो तेज बहादूर यादव नावाच्या बीएसएफ जवानानं. तो जम्मूत नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या चौकीवर नियुक्त आहे पण वरिष्ठांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला हटवण्यात आलंय. सरकार जवानांची काळजी घेतंय पण बीएसएफमधले वरिष्ठ अधिकारी जवानांचं राशन बाजारात विकतात असा आरोप तेज बहादूर यादव यांनी केलाय.

तेज बहादूर यादव यांच्या आरोपानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिलेत. तसच चौकशी अंती संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल अशीही घोषणा केलीय. दरम्यान बीएसएफनं आरोप करणाऱ्या तेज बहादूर यादव यांना कटघऱ्यात उभं करत मनोरूग्न ठरवण्याचा प्रयत्न केलाय.

जवानाच्या आरोपावर बीएसएफचं स्पष्टीकरण
आंतरराष्ट्रीय स्थिती पहाता सीमा रेषेवरची स्थिती कठिण असते. त्याला कारण तिथलं हवामान आणि शत्रुंचं असलेलं अस्थित्व दोन्ही कारणीभूत आहेत. तरीही नियंत्रण रेषेवर काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी चांगल्या प्रतीचं राशन उपलब्ध करून दिलं जातं. ज्या तेज बहादूर यादव यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यात वारंवार गैरहजर रहाणं, सातत्यानं मद्यपान करणं, वरिष्ठांशी गैरवर्तवणूक करणं अशांचा समावेश होतो. त्यामुळेच आतापर्यंत तेज बहादूर यादव यांना वेळोवेळी शिक्षाही करण्यात आलेली आहे. त्यांना सुधारण्यासाठी फोर्सकडून प्रयत्नही केले गेलेत.
 
बीएसएफ हे निमलष्करी दल आहे त्यामुळे लष्करात ते तसं मोडत नाही. बीएसएफ, सीआरपीएफमध्ये अशा प्रकारची स्थिती अनेक वेळेस उजेडात आलीय. आहे त्या स्थितीत सुधारण करायची सोडून बीएसएफनं आरोप करणाऱ्या तेज बहादूर यादव यांनाच मनोरूग्न ठरवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. असं असेल तर त्यांना एवढ्या संवेदनशिल ठिकाणी ड्युटीवर ठेवलंच का असा सवालही निर्माण होतो. अपेक्षा करूयात की मोदी सरकार विरोधकांच्या आरोपांना जसं प्रती आरोपानं उत्तर देतं तसं बीएसएफ करणार नाही..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close