ऐतिहासिक लोणार सरोवराची दुरवस्था

January 10, 2017 4:39 PM0 commentsViews:

10 जानेवारी,प्रफुल खंडारे : बुलडाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे विज्ञान अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. पण सध्या आवर्जून इथं येणारे पर्यटक इथली भकास अवस्था बघून निराश होतायेत. जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या या लोणार सरोवराची अवस्था म्हणजे कुंपणच शेत खातंय अशी आहे.कारण विकासासाठीचा सगळा निधी फक्त बैठकांवरच खर्च होतोय.

लोणार सरोवराला २००२ मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं . त्यानंतर २००४मध्ये लोणार सरोवर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. लोणार सरोवर जागतिक पर्यटन असल्यानं तात्कालीन सरकारनं २००६मध्ये विकास कामासाठी २४० कोटी रुपये मंजूर केले होते. पण या निधीचा वापर विकास कामापेक्षा बैठकावरच खर्च होतायेत. परिणामी या जागतिक दर्जाच्या परिसराची अगदी दुरवस्था झालीये.

lonar

इथला अगदी सुरुवातीचा पिसाळ बाभूळ काढण्याचा मुद्दा अजूनही तसाच प्रलंबित आहे. सरोवरामध्ये घाण पाणी जाऊ नये, यासाठी निरीचा प्रकल्प तयार करून कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा काही फायदा झालेला नाही. या सरोवर परिसराला तारेचं कुंपण करण्यात आलंय.पण कुंपणानंच शेत खाल्लं अशी परिस्थिती सध्या आहे. इथल्या परिसरातल्या अतिप्राचीन ऐतिहासिक वास्तूंचं जतन तर सोडाच पण साधं लक्षही दिलं जात नाहीये. त्यामुळे त्यांची पडझड होऊ लागली आहे.

अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, दैत्यसुदन मंदिर आणि शहर परिसरातील राष्ट्रीय स्मारकांना वसाहतीचा विळखा बसतोय.या वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .लोणार हे एक पौराणिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे. लोणार गावाचा उल्लेख पदम पुराण, स्कंद पुराण आणि विरज महात्म्यमध्ये केलेला आहे. लोणार पूर्वी विरज तीर्थ किंवा विष्णुगया म्हणून ओळखलं जायचं.

लोणारमध्ये ३२ मंदिर, १७ स्मारकं, १३ कुंड, ४ पाण्याचे प्रवाह आहेत. यापैकी २७ मंदिर, ३ स्मारकं, ७ कुंड, ४ पाण्याचे प्रवाह लोणार सरोवराच्या कडेवर आणि मध्ये आहेत. यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरामध्ये लोणार शहराचं सुद्धा नाव होते. पण सध्याची ही भकास परिस्थिती पाहून लोणार सरोवराला आवर्जून भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा मात्र भ्रमनिरास होतोय.

अगदी चालुक्य, यादव, मोगल काळापासून लोणारला महत्त्व होतं.जागतिक अभ्यास केंद्र म्हणून सध्या लोणारमध्ये अभ्यासकही येतात. पण त्याप्रामणं आपण त्याचा दर्जा राखतोय का असा प्रश्न संशोधक विचारतायेत.

या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकार, पर्यटन विभाग सगळ्यांनीच एकत्र येणं गरजेचं आहे.लोणारचं नेमकं महत्त्व जाणून त्या दृष्टीनं पावलं लगेचच उचलली तरच पर्यटन आणि अभ्यास केंद्र म्हणून त्याचा विकास होऊ शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close