युतीचा निर्णय लवकर घ्या!; उद्धव ठाकरेंचा भाजपला अल्टिमेटम

January 10, 2017 7:01 PM0 commentsViews:

Devendra and uddhav

10 जानेवारी :  युतीचा निर्णय लवकरात लवकर घ्या नाहीतर निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करेल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं आहे. भाजपनं युती करण्याबाबत अजूनही बोलणी केलेली नाही. त्यामुळं शिवसेनेची अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ असं सांगत शिवसेनेची अस्वस्थता वाढवलीये.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही भाजप शिवसेनेचं युतीचं काही ठरत नाही. युती होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये जेवढा संभ्रम आहे, त्यापेक्षा जास्त नेत्यांमध्ये संभ्रम आहे. उद्धव ठाकरे तर आता निर्वाणीवर आलेत. किमान निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करण्याअगोदर तरी युतीचं काय ते स्पष्ट करा असं उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय.

दुसरीकडं भाजप मात्र निवांत आहे. मुंबई महापालिकेसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेची अस्वस्थता आणखी वाढवली आहे.

निवडणूक तोंडावर असताना मनसेच्या इंजिनाला अजूनही निश्चित दिशा मिळालेली नाही. राज ठाकरेंनी आता कुठं आपले पत्ते ओपन करायला सुरुवात केलीय. भाजप किंवा शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करण्याचे संकेत राज ठाकरेंनी दिलेत. राज ठाकरेंच्या युतीच्या आवतणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय. राज यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी तर चक्क हात जोडले.

मुंबई महापालिका निवडणूक सगळेच पक्ष लढवणार असले तरी खरा सामना भाजप शिवसेनेचाच असणार आहे. युती करण्याऐवजी तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असं नाटक तरी सेना-भाजप करत नाहीत ना, अशी शंका आता येऊ लागली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close