महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार का?

January 11, 2017 8:00 PM0 commentsViews:

11 जानेवारी : महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता युतीसोबतच, आघाडी होणार की नाही याबद्दलची चर्चेची गुऱ्हाळं सुरु होतील. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होईल की नाही याचं चित्र अजूनही स्पष्ट नाही. नगर परिषद निवडणुकीनंतर आता होणाऱ्या मिनी विधानसभेच्या निवडणुकीत या दोन पक्षाची स्थिती काय असेल त्याचा घेतलेला हा आढावा.

NCP CONGRESS21

नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं संख्याबळ घसरलं. आता महापालिकेत तरी राष्ट्रवादी त्या-त्या ठिकाणची आपली सत्ता राखण्यात यशस्वी होते का हाच खरा प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तर राष्ट्रवादीतले दिग्गज नेते पक्षात घेऊन भाजपनं अजित पवारांना जोरदार धक्का दिलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड राखणं हे अजित पवारांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची लढाई असेल. तर इकडे मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता फारच धुसर दिसतेय. काँग्रेसशी बोलणी करण्याअगोदरच राष्ट्रवादीनं त्यांच्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही करून टाकलीय. काँग्रेससोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीबाबत फार काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर दणकावून टीका केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील ही शक्यता फारच कमी आहे. सध्या या दोन्ही पक्षामध्ये आघाडीबाबत कुठलीही चर्चा सुरू नाही. त्यामुळे काँग्रेसही या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा आपण किती सक्षम आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करेल.

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता सत्ता गेल्यानंतर अस्तित्वाची लढाई लढावी लागतेय. या लढाईत काँग्रेस जरा तग धरेल असं दिसतंय. पण राष्ट्रवादीला मात्र निकराची झुंज द्यावी लागेल. विशेष म्हणजे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close