पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष

January 11, 2017 9:41 PM0 commentsViews:

हलिमा कुरेशी, पुणे

11 जानेवारी : पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था झाली आहे. इमारती कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. 4 हजार कुटुंबांना इमारतींचा ताबा 1985 साली मिळाला आहे. पण 25 वर्षांपासून ड्रेनेज लाईन बदलल्या नसल्यानं पावसाळ्यात या घरांमध्ये सांडपाणी शिरतं. निवडणुकांच्या कालावधीत अनेक आश्वासनं दिली गेली तरी परिस्थिती जैसे थे. म्हाडाच्या दुर्लक्षामुळेच यावर उपाय निघाला नाही.

pune mhada

भेगा गेलेल्या, पडक्या इमारती, प्रत्येक इमारतीला टेकू दिलेला. किल्लारी भुकंपानंतरच इमारती खिळखिळ्या झालेल्या. ड्रेनेज लाईन 25 वर्षापूर्वीच्या त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी सांडपाणी घरात शिरतं. घराच्या उंबऱ्यापर्यंत रस्ता आल्याने रस्ता वर आणि घर खाली अशी परिस्थिती आहे. रोजची मृत्यूची भिति अनुभवणाऱ्या सुगराबी शेख यांना ही भयानक परिस्थिती सांगतांना रडू आवरत नव्हतं. येरवड्याची म्हाडा कॉलनी पाडून नवीन घरं अथवा बैठी घर बांधून द्या अशी मागणी नागरिक करतायत.

समता बालक मंदिर शाळा देखील म्हाडाच्या या अशाच जीर्ण झालेल्या इमारतीत भरते. शाळेतही ड्रेनेजचं पाणी भरतं शिवाय मीटरही पाण्याखाली जातात. अशा वेळी शिक्षक पाण्यात हात घालून पाहतात करंट उतरलाय की नाही आणि मग मुलांना शाळेत सोडलं जातं. गेल्या 20 वर्षांपासून या परिस्थितीला झुंज दिली जातेय.

ही म्हाडा कॉलनी एअरपोर्ट रोडपासून आणि डिफेन्स एरियाजवळ असल्याने दुरुस्ती शक्य नसल्याचं विद्यमान नगरसेवकांचं म्हणणं आहे.

35 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. दुर्घटना घडल्यावर किंवा कुणाचा जीव गेल्यावर गृहनिर्माण मंत्र्यांना जाग आली तर काय उपयोग?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close