पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी गुंडापुंडांच्या सौभाग्यवती रिंगणात

January 11, 2017 10:03 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे
11 जानेवारी :  कोणत्याही पक्षात गुन्हेगारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात त्या पक्षांवर टीका होतेय. ताजं उदाहरण पुण्यात गुटखाकिंग आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्याला भाजपने पक्षात घेतलं आणि या पक्षावर खुप मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता यावर उपाय म्हणुन एखाद्या गुंडाला तिकिट न देता त्याच्या बायकोला तिकीट देऊन दुहेरी फायदा घेण्याची शक्कल काही पक्षांनी लढवली आहे.

BJP- Sena Banner

सध्या गुन्हेगारांना पक्षात घेतलं म्हणून भाजपवर टीकेची झोड उठली. विरोधक याचा राजकीय फायदा उचलतायत. वास्तव हे की गेल्या काही वर्षात सगळ्याच पक्षांत गुन्हेगार वाढलेत. पण पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून आता मनसे आणि शिवसेना या पक्षांनी नामी शक्कल लढवून काढली आहे.

गेल्या मनपा निवडणुकीत कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली. मारणेची पत्नी असली तरी ती वेगळी व्यक्ति आहे ही सबब त्यावेळी खुद्द राज ठाकरेंनी दिली होती. आणि सौ मारणे निवडणुनही आल्या. आता मनसेच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेनं कुख्यात गुंड आणि कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खुन करणाऱ्या शरद मोहोळची बायको स्वाती मोहोळला पक्षात प्रवेश दिला आहे. या निवडणुकीत स्वाती मोहोळ यांना जयश्री मारणे विरोधात उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. यामुळे पक्षांना दुहेरी फायदा होणार आहे. म्हणजे, गुंडांची ताकदही उपयोगी पडते आणि पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत नाही.

निवडणुका म्हटलं की साम, दाम, दंड, भेद याचा अप्रत्यक्ष वापर होतोच. पण पक्षाची प्रतिमा मलिन न करता, गुंडांच्या दहशतीचाही वापर करून घेण्यासाठीची पक्षांची गुंडांच्या बायकोला तिकीट देण्याची शक्कल म्हणजे ‘साप भी मरे और  लाठी भी ना टूटे’. आता सामान्य मतदाराने ठरवायचं आहे की गुंडांना किंवा गुंडांच्या नातेवाईकांना मतदान करणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close