पारदर्शी कारभाराच्या आधारावरच युती होणार- मुख्यमंत्री

January 12, 2017 5:52 PM0 commentsViews:

CM SPEECH

12 जानेवारी :  येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पारदर्शी कारभाराच्या आधारावरच शिवसेनेशी युती करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते गुरूवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची काळजी कार्यकर्त्यांनी करु नये, त्याबाबत पदाधिकारी पाहतील. सैनिकाचं काम लढाई करण्याचं, शत्रू कोण हे पाहू नका, तयारीला लागा, असा आदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्याचबरोबर, केंद्र आणि राज्य सरकारनी केलेल्या कार्याची आणि योजनांची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिकपणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडला.

शिवसेनेशी आम्हाला युती करायची आहे. अनेकबाबतीत सेनेसोबत आमचे मतभेद आहेत. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या काही गोष्टी मान्य नाहीत. पण राज्यात सत्तेत परिवर्तन व्हावं यासाठी युती हवी आहे. सत्ता मिळवण्यासाठी युती नको. यापुढे अजेंड्यासाठीच युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासाठी युती होईल. त्यासाठी पारदर्शक कारभार हवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेने सोबतच्या युतीचा निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील. युती होईल की नाही याची चिंता तुम्ही करू नका. निवडणुकीच्या कामाला लागा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या कार्यर्त्यांना केलं. जनतेसाठी काम करणाऱ्यांनाच संधी देऊ. नेत्यांच्या अवतीभोवती फिरतील त्यांना तिकीट नाही. जनतेच्या भोवती फिरणाऱ्यांचच भलं होईल, असं मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केलं.

तसंच, युतीची काळजी करु नका, सैनिकाचं काम लढाई करण्याचं, शत्रू कोण हे पाहू नका. शिवाजी महाराजांना सेनापती महत्त्वाचे होते, पण मावळेही महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्यक्ष लढाईत मावळेच उतरतात. तसंच पदाधिकाऱ्यांनी बूथच्या कार्यकर्ता हा आपला मावळा आहे, हे समजून कामाला लागावं, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. आव्हानांचं रुपांतर संधीत करा हा पंतप्रधान मोदींचा सल्ला आहे. मोदींनी जनतेला विश्वास दिला, तोच विश्वास आम्ही राज्यात आतापर्यंत दोन वर्ष टिकवला. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार. पण मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे. यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

दोन वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली. दुष्काळ, रिकामी असलेली तिजोरी, पाणी नाही, अशा संकटांना विश्वासाने सामोरे गेलो. आव्हानांचं संधीत रूपांतर केलं. दोन वर्षे दुष्काळालाशी झगडलो, जलयुक्त शिवार राबवलं. 4000 गावं दुष्काळमुक्त केली, असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 15 वर्षात कोणत्या सरकारने समाजाच्या प्रश्नाबाबत इतकी सकारात्मकता दाखवली? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली, ही काळ्या पैशाविरोधातील लढाई आहे. देशातील, महाराष्ट्रातील जनतेने या निर्णयाला समर्थन दिलं. मोदीजी अभिनंदनास पात्र आहेत, राजकीय आयुष्य पणाला लावून देशहितासाठी निर्णय घेतला. पण महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन, त्यांनी पाठिंबा दिला. गरीब, मध्यमवर्गीय रांगेत उभा होता, त्रास होतोय पण निर्णयाला पाठिंबा दिला असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close