आज निवडणुका झाल्यास भारत आणि महाराष्ट्र भाजपमुक्त होईल – नारायण राणे

January 13, 2017 4:21 PM0 commentsViews:

13 जानेवारी :  आजच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर भाजपमुक्त भारत आणि महाराष्ट्र होईल, असा दावा काग्रेसँचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी युती हवी, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, पण ते काहीही झालेलं नाहीये, असा टोला लगावत आज निवडणूक झाली तर भाजपची राज्यातली सत्ता जाऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी  मुख्यमंत्री देवेंद्र फड्णवीस यांच्यासह भाजप, शिवसेनेवर वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांच्या खास राणे स्टाईलने टीका केली आहे. तसंच खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर महात्मा गांधीचं चित्र बदलल्या प्रकरणीदेखील टीकेची झोड उठवली आहे.

Narayan rane21

पारदर्शकतेच्या आधारावर युती करु असं मुख्यमंत्री म्हणतात पण भाजपच्या किरीट सोमैय्या आणि आशिष शेलार यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असताना कोणत्या आधारावर युती करणार,  असा सवाल राणे यांनी केलाय. मुंबई महापालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे मुंबईची हालत खराब झाली असल्याची टीका राणे यांनी केली आहे.

भाजपच्या कालच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मावळे म्हणून संबोधले होतं. त्यावर बोलताना राणे म्हणाले, शिवरायांच्या मावळ्यांचा एकही अंश भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे त्यांना फक्त भाजप सदस्य म्हणावं आणि शिवसैनिकांमधलाही ‘शिव’ काढून, त्यांनाही ‘शिवसेना सदस्य’ म्हणावं, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.

खादी ग्रामोद्योगाच्या यंदांच्या वर्षीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचाही खरपूस समाचार राणे यांनी घेतला. नरेंद्र मोदी हे 11 लाखांचा सूट घालतात पण खादी घालत नाही, असा सणसणीत टोला राणे यांनी मारला आहे. महात्मा गांधी आपल्या कार्याने, त्यागाने महान झाले आहेत. त्यामुळे असे फोटो बदलून स्वत:ची गांधीशी तुलना करणं निषेधार्ह आहे, असंही राणे म्हणाले. मोदी परदेशात जाऊन मी गांधीच्या देशातून आलो आहे हे सांगतात याची आठवण राणे यांनी करुन दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close