पारदर्शक कारभाराचे प्रात्यक्षिक ‘त्या’ जवानाने दाखवले – शिवसेना

January 14, 2017 3:03 PM0 commentsViews:

uddhav thackarey tuljapur

14 जानेवारी :  ‘कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेड्या ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले’, असा सणसणीत टोला आज शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जवान वेडे, आत्महत्या करणारे शेतकरी ठार वेडे, ‘नोटाबंदी’सारख्या विषयावर परखड सत्य मांडणारे देशद्रोही; मग या देशात शहाणे कोण? याचाही एकदा रोखठोक खुलासा केलेला बरा, असंही सेनेने भाजपच्या केंद्रातील सरकारला सुनावले.

शिवसेनेशी युती करण्यासाठी पारदर्शक कारभाराची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली आहे. बीएसएफ जवान तेजबहादूर यादव याच्या व्हिडिओचा दाखला देत या अटीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे.

‘जळून खाक झालेली व जळून भोके पडलेली रोटी या जवानास खावी लागते. ही पारदर्शकताच आहे. डाळीचा पत्ता नसलेले पिवळे पाणी व त्यातून दिसणारा वाटीचा तळ हे तर पारदर्शक व ‘स्वच्छ’ कारभाराचेच लक्षण मानावे लागेल. राज्यकर्ते वेड्यासारखे निर्णय घेतात. ते बरोबर ठरवणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात. एकंदरीत काय तर सगळाच वेड्यांचा बाजार आहे’, अशी तोफही अग्रलेखात डागण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close