रत्नागिरी नरेंद्र महाराजांचा जिल्हा…

May 25, 2010 3:02 PM0 commentsViews: 102

25 मे

टिळक ,आंबेडकरांचा रत्नागिरी आता नरेंद्र महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल…अशी मुक्ताफळं उधळलीत राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी…तीही नरेंद्र महाराजांच्याच उपस्थितीत.

रविवारी नानीज येथील नरेंद्र मठात एक कार्यक्रम झाला. तिथे जाधव यांच्यासोबतच जहाल हिंदुत्ववादी प्रवीण तोगडिया, रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी नरेंद्र महाराजांचे गुणगान गायले.

भाजपाचे आमदार नाना पटोले यांनी आपल्याला केवळ नरेंद्र महाराजांमुळेच विक्रमी मताधिक्य मिळाल्याचे सांगितले. आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर औरंगाबाद मनपाची निवडणूक आपण केवळ नरेंद्र महाराजांमुळेच जिंकल्याचे जाहीर केले…

त्याचवेळी आवेशात भाषण करताना टिळक ,आंबेडकरांचा रत्नागिरी जिल्हा आता नरेंद्र महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल…असे राज्यमंत्री भास्कर जाधव म्हणाले.

पण आता आपण असे बोललोच नाही, असे जाधव म्हणत आहेत. तसेच यापुढे प्रवीण तोगडिया असतील त्या कार्यक्रमाला जाणार नाही, असेही ते म्हणालेत.

दरम्यान भास्कर जाधव यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने मिळमिळीत भूमिका घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी याविषयी गोलमाल उत्तर दिले आहे.

close