राज ठाकरेंकडून हल्ल्याचं समर्थन

October 19, 2008 3:56 PM0 commentsViews: 3

19 ऑक्टोबर, अहमदनगरमनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेची परीक्षा देण्यास आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचं राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. ' आपल्याला अंधारात ठेवून युपी आणि बिहारच्या लोकांची भरती केली जात आहे. महाराष्ट्रातील तरुणांना नोकर्‍या का मिळत नाही. आपण फक्त हातावर हात ठेवूनच बसायचं. ट्रेन भरुन लोक इकडे येतात. नुकतीच 4500 टीसींची भरती करण्यात आली. त्यात एकही महाराष्ट्रीय नाही '. अहमदनगरमधील जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. दरम्यान, मनसेनंतर आता शिवसेनेनंही या आंदोलनात उडी घेतली आहे. मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावं,अशी मागणी करत शिवसेनेनंही नवी मुंबईतल्या परीक्षा केंद्रावर तोडफोड केली. शिवसैनिकांनी यावेळी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनाही मारहाण केली. याबाबत सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, या घटना रेल्वेच्याबाबतीत का घडत आहे, याचा विचार केला पाहिजे. रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी पदाच्या जागा भरल्या जात असतील तर महाराष्ट्रीय तरुणांचा विचार व्हायलाच हवा '. मराठीचा मुद्दा आमचाच हे जणू दाखवण्यासाठी मनसे आणि शिवसेनेत चढाओढ सुरु असल्याचं चित्र या घटनेवरुन दिसत आहे.

close