उष्माघाताचे 69 बळी

May 26, 2010 10:18 AM0 commentsViews:

26 मे

राज्यभरात उन्हाचा कहर वाढला आहे. उष्माघाताने जळगाव आणि विदर्भात आत्तापर्यंत 69 बळी घेतले आहेत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत उष्माघातामुळे चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे 6 दिवसांत उष्माघाताने दगावलेल्यांची संख्या 39 वर पोहोचली आहे. जळगावच्या सरकारी हॉस्पिटलमधील उष्माघात विभागात पेशंट्सची गर्दी झाली आहे.

तापमानानेही 47 अंशांचा आकडा ओलांडला आहे. फैजपूरला काल 47.3 तर भुसावळला 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भात 30 बळी

चंद्रपूरमध्ये तर पारा 47.6 अंशांवर पोहोचला आहे. गेल्या 98 वर्षांत प्रथमच तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्माघातामुळे जिल्ह्यात 8 बळी गेलेत.

तर, संपूर्ण विदर्भात उष्माघातामुळे गेल्या 48 तासांत 30 लोकांचा बळी गेला आहे. यात नागपूर जिल्ह्यात 10, अमरावतीत 7 , वर्ध्यात 5, भंडार्‍यात 4, तर यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला.

काल सर्वात अधिक तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी इथे करण्यात आली. दोनही ठिकाणचे तापमान 48.3 अंश सेल्सियसवर गेले. तर वर्धा जिल्हाचे तापमान 48.2 डिग्री सेल्सियसवर गेले.

उष्णतेची लाट दोन दिवस राहणार

उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला लगेच तरी दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. कारण राज्यातील उष्णतेची लाट जवळपास दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

मान्सून लांबणीवर

लैला वादळाच्या हवामानावरील परिणामामुळे भारतातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यताही पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

येत्या 4-5 दिवसांत मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होईल. त्यानंतर साधारणत: 30 मे ते 3 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले.

close