नक्षलवाद्यांनी ट्रेन उडवली ; 80 ठार, 200 जखमी

May 28, 2010 3:55 PM0 commentsViews: 6

28 मे

नक्षलवाद्यांनी आज पश्चिम बंगालमध्ये रेल्वे ट्रॅक उडवून देऊन भीषण अपघात घडवून आणला. यात हावडा कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरून 80 ठार तर 200 जण जखमी झाले.

पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील झारग्राममध्ये माओवाद्यांनी हा घातपात घडवून आणला. रेल्वे रूळाचा काही भाग उखडून टाकल्याने हावडा कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरले आणि शेजारून जाणार्‍या मालगाडीला धडकले. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.

बेलपहारीमधला माओवादी नेता 'बापी' याचा यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एक्प्रेसच्या ड्रायव्हरने अपघातापूर्वी स्फोटाचा आवाज ऐकला होता, अशी माहिती पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक भूपिंदर सिंग यांनी दिली. अपघाताची जबाबदारी पीसीपीए या संघटनेने स्वीकारली आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. सीआयडीने अपघाताचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरुन दोन माओवादी पोस्टर्सही मिळाली आहेत.

फिशप्लेट काढल्याने अपघात?

रेल्वे रुळ उडवण्यासाठी बॉम्बचा वापर केला होता का, ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. रुळांवरच्या फिशप्लेट्स काढून टाकल्याने गाडी घसरल्याचेही सांगितले जात आहे. ही फिश प्लेट म्हणजे रेल्वेरूळांना जोडणारी एक तांब्याची प्लेट असते.

गुप्तचर खात्याचा इशारा

गेल्या चार दिवसात केंद्रीय गुप्तचर खात्याने राज्य पोलीस आणि रेल्वे पोलिसांना सरदिहा या गावात 150 मावोवादी दाखल झाल्याची माहिती दिली होती. सरदिहा हे झारग्रामपासून केवळ 15 किलोमीटरवर आहे.

या भागात गेल्या आठवड्यात 50 किलो स्फोटके आणि डिटोनेटर्स पोहोचल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. आजपासूनच इथे माओवाद्यांचा काळा सप्ताह सुरू होणार होता. त्याबाबतही प्रशासनाला सजग करण्यात आले होते.

भाजपची समजुतीची भूमिका

या हल्ल्यानंतर भाजपने समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. सरकारवर टीका न करता सगळ्यांनी एकजुटीने नक्षलवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे, असे भाजपने म्हटले आहे.

राजद नेते आणि माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.अशा नक्षल प्रभावीत भागात जिथून रेल्वे जाते, तिथे रेल्वेला पायलट इंजीन लावण्यात यावे, अशी मागणी लालूंनी केली आहे.

close