शिवराज्याभिषेक परवानगी प्रकरणाचे तीव्र पडसाद

May 31, 2010 2:08 PM0 commentsViews: 6

प्रताप नाईक, कोल्हापूर

31 मे

रायगड इथे 6 जूनला होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली आहे त्यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत.

रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रायगडावर शिवराज्यभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो.

गेल्या वर्षी समितीने एक पाऊल पुढे टाकत रायगडावर असणार्‍या रिकाम्या मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा वीरासन रुपातील पुतळा बसवला आणि महोत्सव साजरा केला.

याही वर्षी समितीच्या वतीने 6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. पण अचानक पुरातत्व विभागाने समितीला पत्र पाठवून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम साजरा करू नये, असे पत्र पाठवल्याने शिवप्रेमी संतापले आहेत.

पुरातत्व विभाग नेहमीप्रमाणे आडमुठेपणाचे धोरण राबवत असल्याचा आरोप करत शिवभक्तांनी 6 जूनला रायगडावर कोणत्याही परिस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे ठरवले आहे.

समितीने लोकशाही मार्गाने हा राज्याभिषेक साजरा करण्याचे ठरवले असले तरी शिवभक्तांना आपला राग आवरता आलेला नाही. त्यामुळे काही अज्ञात व्यक्तींनी पन्हाळ्यातील पुरातत्व विभागाच्या ऑफीसची तोडफोड केली. पुरातत्व विभागाच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकही रस्त्यावर उतरलेत.

close