आयपीएलवरून पवार चर्चेत

June 4, 2010 11:54 AM0 commentsViews: 14

4 जून

आयपीएलमधील बिडिंगमध्ये पवार कुटुंबीय सहभागी असल्याची बातमी आज 'टाइम्स ऑफ इंडिया'ने छापली. त्यामुळे पवार कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सिटी कॉर्पोरेशन या कंपनीने आयपीएलमध्ये बोली लावली होती. या सिटी कॉर्पोरेशनमध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शेअर्स आहेत. आयपीएलच्या बोलीतील 16 टक्के शेअर्स पवार आणि त्यांच्या कुटंबीयांचे असल्याचे, 'टाइम्स'ने म्हटले आहे.

त्याचे पुरावेही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सिटी कार्पोरेशने मार्चमध पुणे टीमसाठी झालेल्या लिलावात 1 हजार 176 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र सहाराने तब्बल 1 हजार 176 कोटी देऊन ही बोली जिंकली होती.

पवारांकडून खंडन

दरम्यान पवार यांनी या बातमीचे खंडन करत आयपीएलमधील बिडिंगशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनिरूद्ध देशपांडे यांनी या टीमसाठी केलेले बिडिंग व्यक्तिगत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पण त्याचसोबत पवारांचा हिस्सा असलेल्या सिटी कॉर्प या कंपनीचे नाव देशपांडे यांनी यासाठी का वापरले, याचे उत्तर मात्र पवारांनी देणे टाळले आहे.

राजीनाम्याची मागणी

या सगळ्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. शरद पवारांनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आज भाजपने केली. दिल्लीत पत्रकार परिषदे घेऊन भाजपने ही मागणी केली.

मुंडेकडून हकालपट्टीची मागणी

या प्रकरणात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. ते राजीनामा देणार नसतील तर पंतप्रधानांनी पवार आणि पटेल यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, तसेचसंसदेच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.

काँग्रेस गप्प

आयपीएलच्या मुद्दयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दबावाचे राजकारण केले गेले आहे. त्यामुळे या प्रकरणावर काँग्रेस काय प्रतिक्रिया देते, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण काँग्रेसने या मुद्द्यावर बोलायला नकार दिला. आणि पवारांपासून दोन हात दूर राहणेच पसंत केले आहे.

मोदींकडून पवारांची पाठराखण

आयपीएलचे निलंबित कमिशनर ललित मोदींनी याबाबत पवारांची पाठराखण केली आहे. पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा लिलावाशी काहीही संबंध नसल्याचे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. अनिरुध्द देशपांडे यांनी वैयक्तिक बोली लावली होती, असे त्यांनी म्हटले आहे. मीडियाने सत्य काय आहे, हे जाणून घ्यावे आणि मगच अशा बातम्या द्यावात असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात…

सिटी कॉर्पोरेशनमध्ये पवार कुटुंबाचे 16 टक्के शेअर्स आहेत,ही बाब पवार कुटुंबानी का स्पष्ट केली नाही ?

पवार म्हणतात, अनिरुद्ध देशपांडे यांनी वैयक्तिक बोली लावलीमग बोलीचे पेपर्स हे, सिटी कॉर्पोरेशनच्या नावाने का आहेत ?

पवार म्हणतात, सिटी ग्रुपने बोली जिंकली नाही, यातूनच स्पष्ट होते की,त्यांनी आपले वजन वापरले नाही. मग बोली प्रक्रियेतील एवढी मोठी आर्थिक बाब आतापर्यंत उघड का करण्यात आली नाही ?

close