बाळासाहेबांनी घेतला भाजपचा समाचार

June 4, 2010 1:22 PM0 commentsViews: 3

4 जून

औरंगाबाद मनपाच्या स्थायी समितीच्या निवडणुकीवरून शिवसेना-भाजप युतीत फूट पडली. त्यानंतर शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्लाही केला.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपच्या या भूमिकेचा 'सामना'तील 'मित्रवर्याचा निकाह' या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला आहे…

''औरंगाबादमध्ये आमच्या मित्रवर्यांनी जो उद्योग केला त्यास काय म्हणावे ? महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी मित्रवर्यांनी काँग्रेस पक्षाशी निकाह लावला व विजयाचा बॅण्ड वाजवला. शिवसेना उमेदवाराचा पराभव घडवून आणत मित्रवर्य युतीच्या धर्माला जागले की मित्र धर्मास जागले हे त्यांनीच ठरवावे. आम्ही जातपात मानत नाही.

जातीपातीच्या राजकारणास आणि सौदेबाजीस आमचा विरोध आहे. मित्रवर्यांना जातीपातीचे राजकारण भोवले. जातीनिहाय जनगणनेस त्यांचा उघड पाठिंबा आहे. त्याचमुळे बहुधा मित्रवर्यांनी आपली खरी जात दाखवलेली दिसते. ज्या औरंगाबादेत पापी औरंग्यास गाडले. त्या गाडलेल्या औरंग्याच्या थडग्यावर फुले उधळत गुडघे टेकणारी काँग्रेसची मोगली अवलाद. अशा मोगलांशी निकाह लावून मित्रवर्यांनी काय साधले?

हिंदुत्त्वाच्या पाठीत तुम्ही असेच खंजीर खुपसत असाल तर काँग्रेस पक्ष विसर्जित करायला हरकत नाही. कारण त्यांचा अधुरा राहिलेला जगन्नाथाचा रथ आमचे मित्रवर्यच पुढे नेत आहेत. पाकड्यांचीही गरज नाही. लादेनचीही नाही, बांगलादेशाचीही नाही. मित्रवर्यच फितूर होऊन बदलापूरपासून औरंगाबादपर्यंत सर्वत्र चाँद-तारा फडकवणार्‍यांचे हात मजबूत करीत आहेत. औरंगाबादमध्ये शेवटी पापी औरंग्यांनी मित्रवर्याला बाटवून हिंदुत्त्व कमजोर केले'', असे या अग्रलेखात म्हटले आहे.

दुसरीकडे भाजपने धोका दिल्यानेच औरंगाबादमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला, असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

भाजपने शिवसेनेच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

close