ही तर पवारांचीच ‘माया’…

June 5, 2010 3:01 PM0 commentsViews: 2

अद्वैत मेहता, पुणे

5 जून

आयपीएलच्या पुणे टीमच्या बोलीशी आपला संबंध नाही… सिटी कॉर्पोरेशच्या अनिरूध्द देशपांडेंनी वैयक्तिक पातळीवर ती बोली लावली होती…असा खुलासा शरद पवारांनी केला. पण पवारांची कार्यपध्दती माहीत असणारे यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

ज्याप्रमाणे सुनंदा पुष्कर या शशी थरूर यांच्या प्रॉक्सी असल्याचा आरोप करण्यात आला, त्याचप्रमाणे अनिरूध्द देशपांडे म्हणजे पवारांचाच माणूस असा जाणकारांचा होरा आहे…

आयपीएलच्या पुणे टीमसाठी 1176 कोटी रूपयांची बोली सिटी कॉर्पोरेशनने लावली. या कंपनीत शरद पवारांच्या कुटुंबीयांशी संबंधीत लॅप फायनान्सेस आणि नम्रता फिल्म्स या कंपन्यांचे 16 .5 % शेअर्स असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यावर शरद पवारांना पुन्हा एकदा खुलासा करावा लागला.

मात्र यावेळी, लवासा प्रोजेक्टपासून पवारांच्या अत्यंत जवळचे असणार्‍या अनिरूध्द देशपांडे यांनीच बोली लावल्याने यामागे पवारांचाच हात आहे, या चर्चेला बळ मिळाले. याबाबत पवारांनी लगोलग इन्कार केला आणि 'सिटी'चे एम. डी. अनिरूध्द देशपांडेंनीही पवारांचा कसलाही संबंध नसल्याचा दावा केला.

पवारांची टाऊनशिप प्रोजेक्टमधे कायदेशीर गुंतवणूक असेल, तर त्यात गैर नाही आणि आपण पवारांचे प्रॉक्सी नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.

पवारांची कार्यपध्दती आणि राजकारण जवळून माहीत असणार्‍यांना मात्र या प्रकरणी अनिरूध्द देशपांडे म्हणजेच शरद पवार हे चांगलेच माहीत आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांचेही तेच म्हणणे आहे.

तर क्रिकेटव्यतिरिक्त पवारांचे कुठेच लक्ष नाही, असा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आणि धोरणी नेते आहेत. पण प्रश्न आहे, विश्वासार्हतेचा. आणि पंतप्रधान होण्याची क्षमता असणार्‍या पवारांसारख्या नेत्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा ठेवण्यात चुकीचे काहीच नाही. त्यामुळेच आता हे वादळ पचवून पवार आगामी काळात काय पावले टाकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मनोहरांनी मौन सोडले

या प्रकरणी ललित मोदी हे बोर्डाची आणि बोर्डाच्या सदस्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटले आहे.

इतकेच नाही तर, अनिरुद्ध देशपांडे यांनी वैयक्तिक पातळीवर बिडिंग केल्याचे मोदी यांनी बोर्डाला अजिबात कळवले नव्हते. पुणे टीमसाठी झालेल्या बिडिंगची कागदपत्रे ही सिटी कॉर्प या कंपनीच्याच नावाने झाली होती.

आणि जर अनिरुद्ध देशपांडे यांच्याबद्दलची आगाऊ माहिती बोर्डाला असती तर त्यांना लिलावाअगोदरच नाकारण्यात आले असते, असे शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. मोदी हे बीसीसीआयची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचा आरोपही मनोहर यांनी केला आहे.

आयपीएलचे अंतरिम कमिशनर चिरायू अमिन यांच्यावर मोदींनी केलेले आरोप चुकीचे असल्याचेही मनोहर यांनी म्हटले आहे.

close