दंगल घडवली राजकारण्यांनी…

June 7, 2010 1:42 PM0 commentsViews: 15

चंद्रकांत पाटील, मिरज

7 जून

माजी महापौरच मिरजमधील दंगलीला कारणीभूत होते, असा गौप्यस्फोट एस. पी. कृष्णप्रकाश यांनी आज केला. पण त्यांच्या या गौप्यस्फोटानंतरही दंगलीबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

दंगल घडताना सांगलीचे नेते कुठे होते? 10 दिवसांनंतर तणाव निवळला असला तरी, दंगलीचे खरे सूत्रधार कोण होते? दंगलखोरांवर पोलिसांनी कारवाई केली का? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना अजूनही मिळालेली नाहीत.

दिनांक 2 सप्टेबर …वेळ दुपारी दोनची…. ठिकाण मिरजेचा श्रीकांत चौक…या चौकात लावली होती अफझलखानाच्या वधाची कमान….एकीकडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, तर दुसरीकडे मुस्लिम कार्यकर्त्यांचा जमाव… हातात भगवे आणि हिरवे झेंडे फडकावत दोन्ही बाजूंनी घोषणाबाजीला सुरूवात झाली.. अन् जोरदार दगडफेकीला सुरूवात झाली… त्यानंतर सुरू झाली मिरजची प्रसिद्ध दंगल…

गणशोत्सवात अफझलखानाच्या वधाची ही कमान लावण्याची परवानगी प्रशासनाने शिवसेनेला दिली होती. याच कमानीवर शिवसेना नेत्यांचे फोटोही होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्षांची कमान काढण्याची नोटीस पोलिसांनी दिली. त्याचेच भांडवल करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कमान काढण्यास नकार दिला आणि त्यानंतर दंगल पेटली…पोलिसांनी लाठीचार्ज करून, जमावाला नियंत्रित करुन ती कमान उतरवली. तरीही दंगलीला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप झाला.

सगळे राजकीय नेते या दंगलीला पोलीस जबाबदार असल्याचे सांगत आपापली पोळी भाजून घेत होते. त्याची जाणीव पोलिसांनाही झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीसाठी या गोष्टीचा वापर होत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते.

सेना-भाजपने आलेल्या संधीचा पुरेपूर वापर केला. म्हणूनच गोपीनाथ मुंडे, दिवाकर रावते, परशुराम उपरकर अशा नेत्यांनी सांगलीचा रस्ता धरला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एकगठ्ठा मतदानाच्या भितीने सांगलीतील नेते मात्र गायब होते… आणि होरपळला जात होता तो सामान्य माणूस…

दंगलीचे लोण आजूबाजूच्या जिल्ह्यांतही पोचले होते. सामान्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणे मुश्किल झाले होते… हातावर पोट असणार्‍यांचे अश्रू पुसायला कुणीही पुढे येत नव्हते. सगळे व्यस्त होते दंगलीचे भांडवल करण्यात…

आता कृष्णप्रकाश यांच्या गौप्यस्फोटानंतर दंगलीमागचे हात उजेडात येतील, अशी अपेक्षा मिरजकरांना वाटत आहे.

close