सोमय्यांच्या कारमध्ये सापडले पैसे आणि साड्या? काय आहे नेमकं प्रकरण?

February 17, 2017 4:54 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई

17 फेब्रुवारी : शिवसेना आणि सोमय्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मुलुंडमध्ये काल (गुरूवारी) रात्री मोठा राडा होता होता राहीला. कारण सोमय्यांचा मुलगा नीलच्या गाडीत साड्या आणि पैसे पकडल्याचा आरोप शिवसेनेनं केला, जो पोलीसांनी फेटाळून लावला.

सोमय्या-मातोश्रीचा वाद आता कुठल्याही क्षणी राड्यात रूपांतरीत होतो की काय अशी स्थिती आहे. कारण सोमय्यांचा मुलगा नील हा मुलुंडमधून निवडणूक लढवतोय. शिवसैनिकांची त्याच्यावर करडी नजर आहे. त्याच्या गाडीतून पैसे आणि साड्या वाटल्या जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आणि बघता बघता गर्दी जमली.

Kirit Somaiya and SHivsena

मुलुंडच्या पोलीस ठाण्यातली गर्दी स्फोटक झाली. स्वत: किरीट सोमय्या पळून गेल्याचा आरोप सेनेनं केला. पण पोलीसांच्या तपासात नील सोमय्यांच्या गाडीत ना साड्या निघाल्या ना पैसे आणि शिवसेनेच्या आरोपातली हवा निघाली.

किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर खंडणीचे थेट आरोप केलेत. आता तर त्यांनी भुजबळांच्या मनी लॉड्रींग केसमध्ये शिवसेनेनेही मलिदा खाल्ल्याचा आरोप केलाय. त्यावरही शिवसेना खवळलीय.

सोमय्या आणि शिवसेना नेते एकमेकांच्या संपत्ती, काळे धंदे, घोटाळे यावर आरोप प्रत्यारोप करतायत. त्यांची खरंच एकदा चौकशी व्हावीच अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जातेय. फक्त आता अशा उखाळ्या पाखाळ्या काढणारे नंतर सत्तेसाठी एकत्र येताना दिसले तर मुंबईकर काय करतील?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close