लोकलमध्ये गायनक्लास…

June 9, 2010 12:19 PM0 commentsViews: 2

रोहिणी गोसवी, मुंबई

9 जून

मुंबईकरांच्या आयुष्यातील बराच वेळ हा लोकल प्रवासात जातो. लोकलचा हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. पण या वेळेचा उपयोग स्वत:सोबतच इतरांनाही व्हावा, या उद्देशाने डोंबिवलीच्या अनिता आगाशे यांनी लोकलमध्येच गायनक्लास सुरू केला आहे, आणि तोही मोफत…

उपनगरातून ऑफिसला पाहोचेपर्यंत विरंगुळा म्हणून लोकलमध्ये भजन म्हणणारी मंडळी सर्रास दिसतात. डोंबिवली लोकलमध्ये सध्या एक वेगळे दृश्य दिसते. एक महिला इतर महिलांना गाणे शिकवत आहे. आणि एक सुरात गायनाचा रियाज सुरू आहे. गाणे शिकवणार्‍या महिलेचे नाव आहे, अनिता आगाशे. त्या रेल्वेमध्येच कर्मचारी आहेत.

डोंबिवली स्टेशनमधून रोज सकाळी 7.40 ची लोकल पकडायची आणि पुढच्या दीड ते दोन तास सहप्रवासी महिलांना गाणे शिकवायचे हा त्यांचा रोजचा उपक्रम… संध्याकाळी ऑफिसवरुन परत येताना पुन्हा गायन क्लासेस सुरू…

1986 पासून अनिता आगाशे ट्रेनमधील महिलांना गाणे शिकवत आहेत. आणि त्यांचा हा उपक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला आहे.

एरवी लेडीज डब्याला लागून असलेल्या पुरूषांच्या डब्यातून येणार्‍या आवाजाने महिला वैतागतात. पण 7.40 च्या डोंबिवली स्लोमध्ये चित्र वेगळे असते. लेडिज डब्यातील सुरावटींना बाजूच्या डब्यातील पुरुषही दाद देताना दिसतात.

आगाशेताईंचा हा क्लास काही प्रोफेशनल नाही. याचे कुठल्याही प्रकारचे सर्टिफिकेटही मिळत नाही. फक्त मिळते ते अतीव समाधान…

close