लवासाविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

June 9, 2010 1:38 PM0 commentsViews: 2

आशिष जाधव, मुंबई

9 जून

लोणावळ्याजवळील लवासा व्हॅलीसाठी जमिनी विकत घेताना फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पण आता लवासा कॉर्पोरेशनच्या बंगल्यांच्या जागांमध्येही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. तसेच लवासाच्या अनेक स्किममध्ये कागदोपत्री अनियमितता असल्याचे आढळून आल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या खोर्‍यात सुमारे 25 हजार एकर परिसरात लवासा नावाचे निसर्गरम्य शहर वसवले जात आहे. वरसगाव तलावालगतच्या सात टेकड्यांवर वसणार्‍या लव्हासा कार्पोरेशनच्या या फ्युचर सिटीत आलिशान अपार्टमेंट, बंगल्यांसह करमणूक आणि शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा असणार आहेत. विविध स्किममार्फेत ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

अशीच एक जाहिरात बघून मुंबईतले प्रसिद्ध उद्योजक डॉ. अरूण राव आणि अमृता राव यांनी 2008 च्या सुरूवातीस लव्हासा कार्पोरेशनमध्ये सुमारे सव्वाकोटी रुपयांचा बंगला बुक केला.दोन वर्षांमध्ये तयार बंगल्याचा ताबा देण्यात येईल, असे ऍग्रिमेंटमध्ये नमूद करण्यात आले. त्यानुसार बंगल्याचे प्रत्येकी 12 लाख 77 हजार 680 रुपयांचे दोन हफ्तेसुद्धा डॉ. राव दाम्पत्याने लव्हासाला दिले. तिसरा हप्ता हा बंगल्याचा पाया म्हणजे प्लिंथ झाल्यानंतर द्यायचा होता. पण राव दाम्पत्याला नियोजित बंगल्याची प्लिंथच कुठे पाहायला मिळाली नाही.

लव्हासा कार्पोरेशने युनियन बँकेचे कर्ज काढल्याने लवासा कार्पोरेशनचे खरेदी-विक्रीचे व्यवहार युनियन बँकेच्या खात्यातून होतात. त्यामुळेच लवासाच्या ग्राहकांना गृहकर्जासाठी युनियन बँकेची एनओसी द्यावी लागते. पण डॉ. राव यांच्या बंगल्याच्या हप्त्यांसाठी लवासाने युनियन बँकेकडे खातेच उघडले नाही. तसेच बंगल्याच्या स्किममध्ये फेरफार केल्याची माहिती लवासाच्या वकिलाने डॉ. राव यांना दिली. त्यावेळी आपली पुरती फसगत झाल्याचे डॉ. राव यांच्या लक्षात आले.

दोन वर्ष उलटून गेली तरी बंगल्याच्या जागेचाही पत्ता नाही. पण उलट डॉ. राव यांना लवासाकडून हप्त्यांसाठी रिमाईंडर्स येत आहेत. करार रद्द करण्याची धमकी दिली जात आहे.लवासा कार्पोरेशनने आपल्यासह अनेकांना फसवल्याची जाणीव डॉ. राव यांना झाली आहे.

लवासाच्या व्यवहाराला कंटाळून सह्याद्रीच्या खोर्‍यात चांगली प्रॉपर्टी विकत घेण्याचे स्वप्न बाळगणार्‍या डॉ. राव दाम्पत्याप्रमाणे अनेकजण तक्रार घेऊन पुढे आले तर नवल वाटायला नको.

close