सीएम बाजीगर, दादा सौदागर!

June 11, 2010 11:08 AM0 commentsViews: 3

आशिष जाधव, मुंबई

11 जून

विधानपरिषद निवडणुकीत अखेर आघाडीनेबाजी मारली…भाजपचे दोन उमेदवार निवडून आणून मुंडेंनीही बाजी मारली…तर मनसेने मतांची मिसळ केली…याचा फटका बसला तो शिवसेनेला…शिवसेनेची गणिते या निवडणुकीत पार चुकली…मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अजित पवार या निवडणुकीत खरे सौदागर ठरले…

विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचे सातही उमेदवार निवडून आले. मनसे आणि इतर छोट्या पक्षांच्या बळावर राष्ट्रवादीचा तिसरा आणि काँग्रेसचा चौथा उमेदवार तर निवडून आला. मात्र विधानपरिषदेच्या या आखाड्यात खरी बाजी मारली, ती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी…

तर दुसरीकडे आपल्या उमेदवारांसाठी दुसर्‍या पक्षांची 17 मते फोडून खरे सौदागर ठरले ते राष्ट्रवादीचे अजितदादा पवार. राष्ट्रवादीने मनसची 6, शेकाप आणि सपाची 3 मते मिळवली. लोकसंग्रामचे अनिल गोटे यांचे एक आपल्या पारड्यात खेचताना शिवसेनेचे एक मतही राष्ट्रवादीने पळवले.

कन्हैयालाल गिडवाणी यांनी गोंधळ घातल्याने काँग्रेसला पाठिंबा देणार्‍या 3 उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली मते टाकली. अशी टाइट फिल्डींग लावल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रकाश बिनसाळे पहिल्याच फेरीत निवडून आले. राष्ट्रवादीच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांचा फायदा काँग्रेसचे चौथे उमेदवार विजय सावंत यांना झाला. मनसेची मते आणि शिवसेनेच्या फुटीर मतावर काँग्रेसच्या चौथ्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 13 मते मिळवता आली.

या निवडणुकीत अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंशी हातमिळवणी केल्याचे सरळ स्पष्ट झाले. त्यामुळेच भाजपला जनसुराज्यची दोन, शेकाप आणि मनसेचे प्रत्येकी एक मत मिळाले.

इतकेच नाही तर त्यांनी शिवसेनेची दोन मतेही फोडली. या निवडणुकीत शिवसेनेची खर्‍या अर्थाने पंचाईत झाली. त्यांना दुसर्‍याची मते मिळवता आली नाहीत. शिवाय स्वतःची हक्काची मतेही राखता आली नाहीत. अनिल परब यांच्या पराभवामागे शिवसेनेची फसलेली रणनीती कारणीभूत ठरली आहे.

थोडक्यात काय तर मनसेने आघाडीला मदत केली. मुख्यमंत्र्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…तर अजित पवारांनी राष्ट्रवादीतले आपले दादापण निर्विवाद सिद्ध केले…

close