अजित पवार किंगमेकर!

June 11, 2010 3:07 PM0 commentsViews: 14

अमेय तिरोडकर, मुंबई

11 जून

विधानपरिषदेच्या निवडणुकीत खर्‍या अर्थाने बाजी मारली, ती अजित पवार यांनी! राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना पहिल्या फेरीतच निवडून आणण्याची किमया त्यांनीच करून दाखवली. या निवडणुकीत पडद्याआडून सूत्रे हलवणार्‍या अनेक सौदागरांमधील अजित पवार हा सगळ्यात मोठा सौदागर ठरला!

एकीकडे काँग्रेस हक्काची शंभर मत असताना अधिकचे फक्त एकच मत खेचू शकली. त्यांच्या हक्काच्या मतांतही हेराफेरी झाल्याचा संशय आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादीने स्वत:ची सगळी मते ताब्यात ठेवलीच, शिवाय 17 अधिक मतेही खेचली.

ही मते सहजासहजी आयात झालेली नाहीत. एकाच वेळी समाजवादी पक्षाचा जाहीर पाठींबा घेणे आणि दुसरीकडे मनसेची आघाडीसाठी येणारी मतेही आपल्याकडे वळवणे, अशी कसरतही यात करावी लागली आहे. शिवाय शिवसेनेकडे वळू शकतील अशी काठावरच्या शेकापच्या मतांवरही राष्ट्रवादीने डल्ला मारल्याची चर्चा आहे. आणि शिवसेनेच्या सोबतची काही मतेही फुटली ते वेगळेच.

असे म्हटले जाते की, सर्वपक्षीय आमदारांशी पर्सलन लेव्हलवर अजित पवार चांगले संबंध ठेवून असतात. त्या संबंधांचा फायदा अशा अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळी होतो. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची ही खासियत सगळ्यांनाच माहिती असल्याने अशा निवडणुकीची जबाबदारी नेहमीच त्यांच्यावर येते. या निवडणुकीतून तरी जोडतोड राजनीतीमधील अजित पवारांचे कौशल्य पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आले आहे.

एकीकडे आपले उमेदवार निवडून आणताना राष्ट्रवादीने काँग्रेसचा चौथा उमेदवारही तारला. काँग्रेस आता ते मानो न मानो. पण, या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार सोबत असतील तर, अजित पवार राज्यातील किमान 90 आमदार गळाला लावू शकतात, हा मेसेज नक्कीच गेला आहे.

close