राज आक्रमक, सेना नरम…

June 12, 2010 1:40 PM0 commentsViews: 2

12 जून

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेने मनसेवर धनसे म्हणून टीका करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर पलटवार केला.

आपल्या चार आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठीच मनसेच्या आमदारांनी आघाडीला मतदान केले, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मी कोणालाही बांधिल नाही. आणि शिवसेनेच्या सूचनेवर मी माझा पक्ष चालवत नाही, असेही राज ठाकरे यांनी ठणकावले.

तसेच राजकुमार धूत, प्रीतीश नंदी यांना राज्यसभेवर पाठवताना, शिवसेनेने किती थैल्या घेतल्या, असा सवालही राज यांनी केला.

शिवसेनेचे घुमजाव

विधान परिषद निवडणूक प्रकरणी मनसेने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर शिवसेनेने घूमजाव केले आहे. सेनेने मनसेवर कोणतेच आरोप केलेले नाहीत. फक्त लोकांची मते 'सामना'तून मांडली आहेत.

मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान केल्याचे राज ठाकरे म्हणत आहेत. पण काँग्रेस मात्र त्याचा इन्कार करत आहे. मग ही मते गेली कुठे याची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच शिवसेनेला कुणी नैतिकता शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

close